कुडाळ : आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुडाळ तालुक्यातील ग्रामपंचायत पोखरण – कुसबे बौद्धवाडी येथील कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे.
पोखरण – कुसबे गावचा विकास हा आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून झाला असून विविध योजनांमधून त्यांनी लाखो रुपयांचा विकास निधी देऊन या भागातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत, असे सांगत यापुढील काळातही ते पोखरण – कुसबे गावातील विकासकामांना प्राधान्य देतील, असा विश्वास प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी बोलताना प्रवेशकर्ते म्हणाले निलेश राणे यांच्या पडत्या काळात त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी साथ दिली. मात्र विधानसभा निवडणूकीत कुडाळ-मालवण मतदारसंघ हा शिंदे गटाच्या वाट्याला आल्यामुळे त्यांनी भाजप कार्यकर्त्यांचा विचार न करता शिंदे गटात उडी मारली आहे. तसेच राणे कुटुंब हे प्रथम शिवसेना नंतर काँग्रेस, स्वाभिमान पक्ष, भाजप आणि आता निलेश राणे हे शिंदे गटात गेले आहेत, त्यांच्या या सततच्या पक्ष बदलामुळे कार्यकर्त्यांची फरपट होत आहे. त्यांच्या या सततच्या पक्ष बदलाला कंटाळून व निवडणुकीचे वारे बघून पक्ष बदलणाऱ्या निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास नसल्याने आपण आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.