माणगाव कट्ट्यात माडाच्या बागेत जुगारावर पोलिसांचा छापा

७ जणांवर गुन्हा दाखल, सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त

कुडाळ : तालुक्यातील माणगाव कट्टा येथे एका माडाच्या बागेत सुरू असलेल्या ‘अंदर बाहर’ नावाच्या जुगारावर कुडाळ पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास धाडसी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एकूण २ लाख २९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ४ हजार ९०० रुपयांची रोख रक्कम आणि एकूण चार दुचाकींचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी सर्व ७ संशयित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक नितीन राजेंद्र शेडगे यांनी या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खेळण्याच्या मैदानाजवळील माडाच्या बागेत जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती कुडाळ पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात अचानक छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच जुगार खेळणाऱ्यांमध्ये एकच पळापळ झाली आणि सातपैकी सहा जण अंधाराचा व गर्दीचा फायदा घेत घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र, पोलिसांनी सतर्कता दाखवत गणपत धोंडी धुरी (वय ६१, रा. माणगाव बेनवाडी) याला जागीच रंगेहाथ ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या संशयिताची कसून चौकशी केली असता, पळून गेलेल्या इतर ६ साथीदारांची नावे समोर आली आहेत. यामध्ये विशाल विजय लाड (वय ४५, रा. ढोलकरवाडी), सुनील बाबू भगे (वय ३५, रा. माणगाव बाजार), श्रीकांत अर्जुन केरकर (वय २७, रा. माणगाव तिठा), प्रकाश बाळकृष्ण लाड (वय ३८, रा. ढोलकरवाडी), राजन शशिकांत मयेकर (वय ५०, रा. कट्टावाडी) आणि सोमा बाबू सुकी (वय ५८, रा. माणगाव तिठा) यांचा समावेश आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी एक पॅशन प्रो, दोन बजाज डिस्कव्हर आणि एक बजाज फ्रीडम अशा चार दुचाकींसह रोख रक्कम जप्त केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

error: Content is protected !!