आकेरी-माणगाव मार्गावरील वाहतूक सुरळीत; ग्रामस्थांनी मानले आभार
योगिता कानडे/कुडाळ : माणगाव जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे यांच्या सततच्या पाठपुराव्याला अवघ्या तीन दिवसांत मोठे यश आले आहे. रस्ता सुरक्षेचा प्रश्न तात्काळ मार्गी लावत सार्वजनिक बांधकाम विभागाने आकेरी-माणगाव रस्त्यावरील धोकादायक खड्डे सिमेंट काँक्रीटच्या साह्याने बुजवून वाहतूक सुरळीत केली आहे.
आकेरी-माणगाव दरम्यान असलेल्या ढोलकरवाडी येथील नवीन बांधलेल्या छोट्या पुलावर आणि आकेरी-माणगाव-शिवापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना व नागरिकांना तीव्र त्रासाला सामोरे जावे लागत होते. नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे यांनी २१ ऑगस्ट रोजी बांधकाम विभागाला पत्राद्वारे त्वरित दुरुस्तीची मागणी केली होती.
रुपेश कानडे यांच्या पत्राची गांभीर्याने दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने अवघ्या ३ दिवसांत, म्हणजेच २४ ऑगस्ट रोजी कामाला सुरुवात केली. ढोलकरवाडी पुलावरील आणि शिवापूर रस्त्यावरील खड्डे सिमेंट काँक्रीटचा वापर करून मजबूत पद्धतीने बुजवण्यात आले आहेत.
प्रशासनाच्या या जलद कारवाईमुळे हा रस्ता आता वाहतुकीसाठी सुरक्षित व गतिमान झाला आहे. वेळेवर आणि योग्य पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावल्याबद्दल माणगाव परिसरातील नागरिकांनी आणि वाहनधारकांनी जि. प. सदस्य रुपेश कानडे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.




Subscribe










