
भूपकरवाडीतील तलावात दोन दिवस सुरू होते बचावकार्य; ग्रामस्थांच्या सहकार्याने मगर सुखरूप नैसर्गिक अधिवासात
पिंगुळी : पिंगुळी भूपकरवाडी येथील तलावात अडकलेल्या मगरीची अखेर वनविभागाच्या जलद बचाव पथकाने (RRT) तब्बल दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर सुखरूप सुटका केली. खोल तलाव, मोठ्या प्रमाणातील पाणी, गाळ आणि सतत सुरू असलेला पाण्याचा प्रवाह यामुळे हे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक बनले होते. मात्र वनविभागाच्या पथकाने धैर्याने प्रयत्न करत मगरीला सुरक्षितपणे पकडण्यात यश मिळवले.
दि. २४ रोजी ग्रामस्थांकडून तलावात मगर पडल्याची माहिती वनविभागाला मिळाली. माहिती मिळताच वनविभागाची RRT टीम व कुडाळ वनक्षेत्रपाल कार्यालयातील कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तलाव खोल असल्याने सुरुवातीला मगरीचा शोध घेणे आणि तिला पकडणे कठीण जात होते. त्यामुळे मड पंपच्या सहाय्याने तलावातील पाणी कमी करण्यात आले. त्यानंतर बचावकार्य पुन्हा वेगाने सुरू करण्यात आले.
तलावाच्या एका बाजूने पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने तसेच तळाशी मोठ्या प्रमाणात गाळ असल्यामुळे बचाव पथकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अखेर सलग दोन दिवसांच्या प्रयत्नांनंतर सुमारे पाच ते सहा तासांच्या अथक मोहिमेला यश आले आणि मगरीला सुरक्षितपणे पकडण्यात आले.
मगरीची कुडाळ येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. मगरीला कोणतीही इजा अथवा जखम झाली नसल्याची खात्री झाल्यानंतर तिला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
या बचावकार्यात पिंगुळीतील ग्रामस्थांनीही वनविभागाला मोठे सहकार्य केले. मगरीची सुटका झाल्यानंतर गणेशकुंडमधील गाळ काढून परिसराची स्वच्छता करण्यात आली.
ही संपूर्ण कारवाई उपवनसंरक्षक सावंतवाडी मिलिंद शर्मा व सहायक वनसंरक्षक सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वनक्षेत्रपाल चेतन पाटील, वनपाल सूर्यकांत सावंत, वनरक्षक समीर खरवत, वनरक्षक सागर भोजने यांच्या उपस्थितीत RRT पथकातील अनिल गावडे, प्रसाद गावडे, वैभव अमृस्कर, सुशांत करंगुटकर, संतोष इब्रामपुरकर, यशवंत कदम, दिवाकर बांबर्डेकर व राहुल महेकर यांनी बचावकार्य केले.
तसेच ग्रामपंचायत सदस्य आयाज खुल्ली, मंगेश चव्हाण व पोलीस पाटील शंकर सातार्डेकर यांनी मगरीच्या बचावासाठी सहकार्य केले.
यावेळी लवू खोर्जूवेकर, अजय बांदेकर, चेतन पेडणेकर, केतन शिरोडकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते.
वनविभागाच्या RRT पथकाने अत्यंत कठीण आणि जोखमीच्या परिस्थितीत केलेल्या या धाडसी बचावकार्याचे पिंगुळी ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.



Subscribe








