आठ तास रेस्क्यू ऑपरेशन; मुसळधार पावसामुळे बचावकार्याला अडथळा
पिंगुळी : पिंगुळी भूपकरवाडी येथील गणेशकोंडमध्ये भलीमोठी मगर आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. भूपकरवाडी येथील कृष्णा विश्वास चव्हाण या बालकाला सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास गणेशकोंडच्या पाण्यात मगर दिसून आली. त्याने ग्रामस्थांना माहिती दिल्यानंतर काही क्षणांतच ही बातमी संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली.
मगर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच गोंधळपूर पोलीस पाटील शंकर सातार्डेकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित यंत्रणांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. त्यानंतर ग्रामपंचायत सरपंच मा. अजय आकेरकर ग्रामपंचायत सदस्य आयाज खुल्ली व मंगेश चव्हाण यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. सरपंचांनी तातडीने सर्व संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून रेस्क्यू ऑपरेशनसाठी आवश्यक व्यवस्था केली.
यानंतर वन विभाग सावंतवाडीचे जलद कृती दल (रेस्क्यू टीम), एमआयडीसी अग्निशामक सेवा, कुडाळ नगरपंचायत अग्निशामक सेवा तसेच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनीही रेस्क्यू पथकाला पूर्ण सहकार्य केले.
पाणी उपसा करूनही मगर हाती नाही
मगर पकडण्यासाठी गणेशकोंडमधील पाणी पंपाच्या साहाय्याने बाहेर काढण्यास सुरुवात करण्यात आली. जवळपास एक तास पाणी उपसा केल्यानंतर पाण्याची पातळी काही प्रमाणात कमी झाली आणि मगर पाण्यात असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. त्यामुळे मगर पकडली जाणार अशी आशा निर्माण झाली.
मात्र, अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्याचवेळी संजय पाटकर यांच्या घरामागील ओहळातील बांधारा फुटल्याने पुन्हा मोठ्या प्रमाणात पाणी गणेशकोंडमध्ये शिरले. त्यामुळे रेस्क्यू टीमच्या प्रयत्नांना मोठा अडथळा निर्माण झाला.
सुमारे आठ तासांच्या अथक प्रयत्नांनंतरही मगर पकडण्यात यश आले नाही. अखेर मगर गणेशकोंडच्या बाहेर जाऊ नये यासाठी रेस्क्यू टीमने परिसराला जाळी लावून सुरक्षित केले असून पुढील रेस्क्यू ऑपरेशनसाठी तयारी सुरू आहे.
गणेशोत्सव तोंडावर; ग्रामस्थांची चिंता वाढली
गणेशोत्सव जवळ आला असून भूपकरवाडीतील गणेशकोंडमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जन केले जाते. त्यामुळे गणेशकोंडमध्ये मगर आढळल्याने ग्रामस्थ आणि पिंगुळीवासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. मगर लवकरात लवकर पकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, सामाजिक बांधिलकी जपत युवा उद्योजक समीर मयेकर यांनी रात्री सुमारे ७ वाजता रेस्क्यू टीम, अग्निशामक दलाचे कर्मचारी तसेच ग्रामस्थांसाठी नाश्त्याची व्यवस्था केली.
यावेळी राजा मुंडये, कृष्णा चव्हाण, अजय बादेकर, चेतन पेडणेकर, प्रथमेश मुंडये, केशव पेंडणेकर, सिद्धेश माणगावकर, अनिकेत आंदुलेकर, संदीप करंगुटकर, कमलेश भगत, चंदू करंगुटकर, समीर धुरी, हेमंत करंगुटकर, सुशांत पाटकर, राजा पांचाळ, रोहन परब, अमजद शेख, करण मुंडये, गणेश भगत सूरज वाकर, प्रशांत चव्हाण मयूर खोत यांच्यासह ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशकोंडमधील मगर आता कधी पकडली जाणार? याकडे पिंगुळीवासीयांचे लक्ष लागले आहे.



Subscribe










