नगरसेवक मंदार शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अभियंता श्री. पिसाळ याना निवेदन
सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) निवेदनाद्वारे ‘रस्ता रोको’चा इशारा!
कुडाळ : कुडाळ-बाव या मुख्य जिल्हा मार्ग क्रमांक २७ (MDR 27) वरील विशेषतः आंबेडकर नगर आणि कविलकट्टा तसेच दत्तनगर रोड परिसरातील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, येथे पडलेल्या भव्य खड्ड्यांमुळे प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत.
तसेच गणेश चतुर्थी हा सण देखील काही दिवसांवर आहे त्यामुळे रेल्वेने येणाऱ्या लोकांची देखील संख्या वाढल्याने सदर रस्त्यावर वर्दळ वाढणार आहे या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज, २५ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक नागरिक आणि शिवसेना शिष्टमंडळाने कुडाळ उपविभागाचे मा. कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांची भेट घेतली व त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी प्रशासनाने तातडीने खड्डे न बुजविल्यास ‘थेट खड्ड्यात बसून आणि रस्ता रोको’ आंदोलन छेडण्याचा आक्रमक इशारा दिला आहे.
खड्ड्यांमुळे रोज अपघात, प्रशासन सुस्त:
आंबेडकर नगर,दत्तनगर रोड आणि कविलकट्टा परिसरात रस्त्यावर प्रचंड मोठे आणि खोल खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही, ज्यामुळे येथे रोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. दुचाकीस्वार, शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना या रस्त्यावरून प्रवास करणे अत्यंत क्लेशदायक व धोकादायक बनले आहे.
वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.७ दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा तीव्र आंदोलन:”रस्त्यावरील या जीवघेण्या खड्ड्यांमुळे एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यास त्याला संपूर्णपणे PWD विभाग जबाबदार असेल,” असा इशारा शिष्टमंडळाने दिला.
हे खड्डे पुढील ७ दिवसाआत दर्जेदार पद्धतीने बुजवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या मुदतीत प्रशासनाने कारवाई न केल्यास कायदा व सुव्यवस्थेची पर्वा न करता तीव्र रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.यावेळी उपजिल्हप्रमुख अमर सावंत, तालुका प्रमुख राजन नाईक, नगरसेवक मंदार शिरसाठ, नगरसेवक संतोष शिरसाठ,सुशील चिंदरकर, नितीन सावंत,बाळा पावसकर,अमित राणे,भूषण कुडाळकर, गुरु गडकर, संजय मसुरकर,धीरेंद्र चव्हाण , अभियंता श्री. बामणे तसेचआंबेडकर नगर व कविलकट्टा परिसरातील नागरिक उपस्थित होते.


Subscribe









