दोडामार्ग तालुक्यातील कुडासे येथील घटना
दोडामार्ग : नव्याने खरेदी केलेल्या फ्लॅटच्या पूजेनिमित्त मुंबईहून गावी आलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुडासे-वानोशी येथील तिलारी नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेल्या वेदांत सचिन सांगेलकर (वय १३, रा. दादर, मुंबई) या मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळ सोनावल येथील कल्पना रविंद्र पाडलोस्कर या आपल्या नातवंडांसह मुंबईहून दोडामार्ग येथे आल्या होत्या. त्यांनी नुकताच नवीन फ्लॅट खरेदी केला असून काही दिवसांत तेथे पूजेचा कार्यक्रम होणार होता. यासाठी इतर नातेवाईकही गावी येणार होते. मंगळवारी दुपारनंतर नातवंडांनी नदीवर आंघोळीसाठी जाण्याचा आग्रह धरला. त्यानुसार कल्पना पाडलोस्कर या नातवंडांसह कुडासे-वानोशी येथील तिलारी नदीवर गेल्या. सुरुवातीला वेदांत आणि त्याचा मोठा भाऊ नदीत उतरून आंघोळ करत होते. काही वेळाने मोठा भाऊ काठावर आला. याचदरम्यान वेदांत खोल पाण्याकडे गेला. आजींनी त्याला पुढे जाऊ नकोस, असा इशारा केला; मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला.
वेदांत बुडत असल्याचे लक्षात येताच आजींनी आरडाओरडा केला. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत वेदांतला पाण्याबाहेर काढून साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी पथकासह रुग्णालयात धाव घेतली. घटनेचा पंचनामा उशिरापर्यंत सुरू होता.


Subscribe










