ट्रक क्लिनरचा आत्महत्येचा प्रयत्न

स्वतःच्याच गळ्यावर व पोटावर केले चाकूने वार

मालवण : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील निलजी गावातील मानदेश निगोडा पाटील यांनी चौके-साळेल रस्त्यावरील चिरेखाणीवर स्वतःच्या गळ्यावर तसेच शरीराच्या अन्य भागांवर धारदार हत्याराने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज (दि.25) सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालय, ओरोस येथे पाठविण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गडहिंग्लज-निलजी परिसरातून चौके येथे चिरे भरण्यासाठी आलेल्या एका वाहनावर ते क्लीनर म्हणून काम करत होते. चौके-साळेल परिसरातील एका चिरेखाणीवर असताना त्यांनी सोबत आणलेल्या धारदार सुरीने स्वतःच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. तसेच पोट, हात आणि शरीराच्या अन्य भागांवरही वार करून घेतले.या घटनेत ते गंभीर जखमी झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना तातडीने चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. साहिली मिठारी आणि आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र जखमा गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना जिल्हा रुग्णालय, ओरोस येथे हलविण्यात आले.

दरम्यान, घटनेची माहिती मालवण पोलीस ठाण्यात देण्यात आल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. पी. पाटील, पोलीस उपनिरीक्षक आशिष भगत, हेमंत धुरी, सुहास पांचाळ, सूरज रेडकर तसेच साळेलचे पोलीस पाटील रवींद्र गावडे यांनी चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देऊन घटनेची माहिती घेतली.यावेळी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीने आपण आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांना सांगितल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

जखमीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी चौके गावचे माजी सरपंच राजा गावडे, नांदरूखचे सरपंच भाऊ चव्हाण, बंड्या गावडे, मानस गावडे, अमोल चव्हाण, साई गावडे, गोठ्या गावडे यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी मदत केली. जखमीची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

error: Content is protected !!