महामार्ग क्रॉस करताना जखमी झालेल्या शेकरूला वनविभाग सावंतवाडी, डॉक्टर व रेस्क्यू टीमकडून जीवदान

कुडाळ : महामार्ग क्रॉस करताना अपघातग्रस्त झालेल्या इंडियन जायंट स्क्वेरल (शेकरू) या दुर्मिळ वन्यप्राण्याला वनविभाग, पशुवैद्यकीय तज्ज्ञ आणि वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त प्रयत्नातून उपचार करून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडण्यात आले.

तेर्से बांबर्डे बस स्टॉप परिसरातील नदीकिनारी महामार्ग क्रॉस करताना जखमी अवस्थेत शेकरू आढळून आला होता. याबाबत माहिती देणारे बाळा जाधव यांनी तात्काळ वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर संस्थेशी संपर्क साधला. त्यानंतर डॉ. प्रसाद कमलाकर धुमक यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित शेखरूचे सुरक्षित रेस्क्यू केले.

डॉ. संतोष वाळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेकरूवर आवश्यक उपचार करण्यात आले. पशुवैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार देण्यात आले तसेच शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.

रेस्क्यू नंतर शेखरूला फिडर च्या माध्यमातून शेंगदाणे, काजूगर, नाचणी व जीवनसत्वयुक्त आहार प्रत्येक चार तासांच्या अंतराने देण्यात आला. एक दिवसाची फिडींग व निगा मंदार गावडे यांनी सांभाळली.

सावंतवाडी वनविभागाचे ACF वैभव बोराटे यांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार व पुनर्वसन प्रक्रिया पार पडली. तसेच कुडाळ वनविभागाचे वनपाल सचिन पाटील आणि वाइल्ड लाईफ वार्डन भाग्यश्री परब यांनी वेळोवेळी उपस्थित राहून शेकरूच्या प्रकृतीची पाहणी केली.

प्रकृती स्थिर झाल्यानंतर संबंधित शेखरूला ज्या ठिकाणाहून रेस्क्यू करण्यात आले होते त्याच नैसर्गिक अधिवासात तेर्से बांबर्डे बस स्टॉप जवळील नदीकिनारी — सुरक्षितपणे रिलीज करण्यात आले.

रिलीज दरम्यान RRT टीम, संबंधित अधिकारी, तसेच चेऊलकर सर उपस्थित होते. वन्यजीव संरक्षणासाठी वनविभाग, डॉक्टर आणि स्थानिक नागरिकांनी केलेल्या या संयुक्त प्रयत्नाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

वन्यजीवांना स्वतःहून खायला घालणे अथवा उपचार करणे हा कायद्याने गुन्हा ठरू शकतो. सदर उपचार व फिडींग हे सर्व वनविभाग व पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करण्यात आले होते. नागरिकांनी कोणताही जखमी वन्यजीव आढळल्यास स्वतः उपचार करण्याचा प्रयत्न न करता तात्काळ वनविभागाच्या 1926 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर संस्थेच्या हेल्पलाईन क्रमांक, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!