पिंगुळीत धाडसी कार्याचा गौरव

सरपंच अजय आकेरकर यांच्या हस्ते वनविभागाच्या RRT टीमसह बालकाचा सत्कार

पिंगुळी : गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर पिंगुळीतील गणेशकोंड येथे गणपती विसर्जनासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होणार असताना, संभाव्य मोठा अनर्थ टळल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेची दखल घेत पिंगुळी ग्रामपंचायतीचे सरपंच अजय आकेरकर यांनी धाडसी कामगिरी करणाऱ्या वनविभागाच्या RRT टीममधील अनिल गावडे, सुशांत करंगुटकर तसेच प्रसंगाची माहिती देणाऱ्या कृष्णा विश्वास चव्हाण या बालकाचा सत्कार केला.

कृष्णा विश्वास चव्हाण या बालकाच्या प्रसंगावधानामुळे मगर आढळल्याची माहिती वेळीच मिळाली आणि पुढील मोठा अनर्थ टळण्यास मदत झाली. त्याच्या या धाडसाची दखल घेत सरपंच अजय आकेरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन कृष्णाचा सन्मान केला. यावेळी कृष्णाचे वडील विश्वास चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले.

मगर रेस्क्यू मोहिमेत जीवाची पर्वा न करता अथक प्रयत्न करणारे पिंगुळी गावचे सुपुत्र तसेच वनविभाग RRT टीमचे अनिल गावडे आणि सुशांत करंगुटकर यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून ग्रामपंचायत सरपंच अजय आकेरकर यांनी सुशांत करंगुटकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तर माजी सरपंच राजा पांचाळ यांनी अनिल गावडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.
यावेळी सरपंच अजय आकेरकर व माजी सरपंच राजा पांचाळ यांनी, “गावासाठी आपण करत असलेले कार्य कौतुकास्पद असून, आपल्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे. पिंगुळी गावातील तरुणांकडून अशा प्रकारचे धाडसी व समाजोपयोगी कार्य घडत आहे, ही अभिमानाची बाब आहे,” असे गौरवोद्गार काढत अनिल गावडे व सुशांत करंगुटकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सुशांत करंगुटकर यांचे वडील सुभाष करंगुटकर यांनी आपल्या मुलाच्या कार्याचा आपल्या कडून झालेला सन्मान हा अविस्मरणीय असल्याचे सांगत सरपंच अजय आकेरकर, माजी सरपंच राजा पांचाळ तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण, पोलीस पाटील सतीश माडये, शंकर सातार्डेकर, केतन शिरोडकर, संदीप करंगुटकर, वैभव करंगुटकर, विजय करंगुटकर, गुरुनाथ पाटकर, गिरीराज धुरी, विशाल कुंभार आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!