कुडाळच्या व्यावसायिक तरुणावर गोव्यात जीवघेणा हल्ला

चौघांवर गुन्हा दाखल

कळंगुट: गोव्यातील प्रसिद्ध बागा येथील एका क्लबमध्ये कुडाळ येथील एका ३२ वर्षीय व्यावसायिक तरुणावर पहाटेच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिल्टन डिसोझा असे या जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, तो मूळचा कुडाळचा रहिवासी आहे व सध्या हळदोणा गावातील साईनगर भागात राहतो. बागा येथील ‘टिटोज लेन’वर असलेल्या ‘हवेली क्लब’मध्ये पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या हल्ल्यात मिल्टन हा किरकोळ जखमी झाला आहे.

याप्रकरणी जखमी मिल्टन डिसोझा याने दिलेल्या तक्रारीवरून कळंगुट पोलिसांनी चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शैलेश सातालिया, अनुप सातालिया, श्रीकांत आणि कमलेश सातालिया अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या चौघांनी मिळून मिल्टनवर बियरची बाटली फोडून आणि सुरीने वार करत प्राणघातक हल्ला चढवला. या कृत्याबद्दल पोलिसांनी संशयितांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३ (५) सह कलम ११८ (१) अन्वये गुन्हा क्र. ८१/२०२६ नोंदवला आहे.

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या बागा परिसरातील क्लबमध्ये अशा प्रकारे थेट सुरी आणि काचेच्या बाटल्यांनी हल्ला झाल्यामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. व्यावसायिक वैमनस्यातून किंवा इतर कोणत्या कारणातून हा वाद झाला, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. कळंगुट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) विश्वजित धवळिकर या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

error: Content is protected !!