कुडाळ : एक परिवार एक बँक हे ब्रीद घेऊन कार्यरत असणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्रने ग्राहकांशी जिव्हाळ्याचे नाते जोपासून केलेली वाटचाल कौतुकास्पद आहे या बँकेच्या माध्यमातून ज्या विविध योजना आहेत त्याचा लाभ ग्राहकांनी निश्चितच घ्यावा असे प्रतिपादन संत राऊळ महाराज कॉलेजच्या प्राचार्या डॉ सौ स्मिता सुरवसे यांनी ग्राहक मेळाव्याप्रसंगी बोलताना शुक्रवारी सायंकाळी कुडाळ येथे केले.
ग्राहकांना बँकेच्या विविध योजना समजाव्यात यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र कुडाळ ब्लॉक अंतर्गत कुडाळ ,कडावल, पाटपरुळे ,ओरोस, कट्टा, मालवण, आचरा, कसाल या आठ शाखांचा एकत्रित ग्राहक मेळावा तसेच लाभार्थी ग्राहकांना कर्ज मंजुरी पत्र वाटप अशा कार्यक्रमाचे आयोजन हॉटेल लेमनग्रासच्या सभागृहात शुक्रवारी करण्यात आले होते. या ग्राहक मेळाव्याचे उद्घाटन डॉ. सौ सुरवसे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी उद्योजक श्री राकेश म्हाडदळकर ,श्री अभिजीत जैतापकर, बँक ऑफ महाराष्ट्र रत्नागिरी झोनलचे अधिकारी श्री संतोष कुमार, श्री श्रीराम गुप्ता, सौ. मानसी जोशी, कुडाळ शाखाधिकारी अविनाश सुतार, ओरोस शाखाधिकारी अविनाश साळोखे, मालवण शाखाधिकारी बैजनाथ गुप्ता, पाट परुळे शाखाधिकारी रोहन खरे ,आचरा शाखाधिकारी राजा पोईपकर, कडावल शाखाधिकारी कालीचरण सोनवणे, कट्टा शाखाधिकारी स्वप्निल गायकवाड,कसाल शाखाधिकारी अजय कुमार,आठही शाखांचे बँक अधिकारी बँक कर्मचारी ग्राहक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ सौ सुरवसे म्हणाल्या बँकेने ग्राहकांशी कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाते जोपासलेले आहे .या बँकेच्या माध्यमातून विविध योजना आहेत त्याचा प्रत्येकाने लाभ घेतला पाहिजे, तसेच कॉलेजमध्ये मोबाईलच्या माध्यमातून होणारे अनेक फ्रॉड तसेच विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या विविध योजना यासाठी बँकेने कॉलेजमध्ये मार्गदर्शन शिबीर घ्यावे असे सांगितले.
बँकेचे झोनल अधिकारी श्री संतोषकुमार यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या शैक्षणिक, व्यावसायिक, शेती विषयक, कार लोन, होम लोन, यासाठी देण्यात येणाऱ्या कर्जावर अत्यंत व्याजदर कमी असून त्याचा लाभ ग्राहकांनी घ्यावा असे सांगितले. कुडाळ शाखाधिकारी श्री सुतार यांनी ग्राहक मधील संवाद अधिक दृढ व्हावा ,त्यांना अनेक योजनांचा लाभ मिळावा, अनेकांना कर्ज मंजुरी पत्रे देऊन ग्राहकांशी ऋणानुबंध जोपासून त्यांची अधिक सेवा करण्याची संधी बँकेच्या माध्यमातून होऊन हे नाते अधिक दृढ करणे हा आमचा उद्देश असल्याचे सांगून ग्राहकांची प्रगती हेच आमचे यश, असे सांगितले.
अविनाश साळोखे यांनी सुकन्या समृद्धी योजना, स्वप्नील गायकवाड यांनी कार लोन गोल्ड लोन व्यावसायिक लोनबाबत मार्गदर्शन केले. श्री गुप्ता यांनी सुद्धा विविध योजनांबाबत माहिती दिली यावेळी बँकेच्या ग्राहकांना घर, वाहन, शैक्षणिक, व्यावसायिक बाबत कर्ज मंजुरी पत्रे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली मेळाव्याचे सूत्रसंचालन बँक हेड कॅशियर सौ मानसी जोशी यांनी केले. तर आभार श्री सोनवणे यांनी मानले.





Subscribe










