“गावडे सर-मॅडम यांचा निरोप मनाला चटका लावणारा”

सरपंच अजय आकेरकर भावूक; पिंगुळी केंद्र शाळेत सांगता निरोप सोहळा

पिंगुळी : पिंगुळी केंद्र शाळा नं. १ येथील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या मनात आपले विशेष स्थान निर्माण करणारे शिक्षक सदाशिव गावडे सर व सावंत मॅडम यांच्या सांगता निरोप समारंभाला भावनिक वातावरण निर्माण झाले.

अनेक वर्षांच्या सेवेत विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच संस्कार, शिस्त आणि माणुसकीची शिकवण देणाऱ्या या शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

या कार्यक्रमात पिंगुळी ग्रामपंचायतीचे सरपंच मा. अजय आकेरकर यांनी व्यक्त केलेल्या भावना विशेष ठरल्या.
गावडे सर व सावंत मॅडम यांच्या बदलीची माहिती समजल्यानंतर मन खचल्यासारखे झाले, असे सांगताना सरपंच आकेरकर भावूक झाले. “शाळेतील मुलांना, पालकांना आणि संपूर्ण शाळेला त्यांनी आपल्या घरातील व्यक्तींप्रमाणे जपले. त्यांच्या कामाची आणि आपुलकीची जागा भरून काढणे निश्चितच कठीण आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
“गावडे सर आणि सावंत मॅडम यांनी विद्यार्थ्यांना फुलांप्रमाणे जपले” असे सांगत सरपंचांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा उल्लेख करत, त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी सरपंच अजय आकेरकर यांच्या हस्ते सदाशिव गावडे सर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पिंगुळी केंद्र शाळा नं. १ च्या वतीने गावडे सर व सावंत मॅडम यांचा शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
गावडे सर व सावंत मॅडम यांच्या शालेय कार्यकाळातील आठवणी पालक आणि विद्यार्थ्यांनी मनोगतातून व्यक्त केल्या. आपल्या आवडत्या शिक्षकांविषयी बोलताना अनेक विद्यार्थी व पालक भावूक झाले. शिक्षकवर्गानेही गावडे सरांकडून मिळालेले मार्गदर्शन, प्रेरणा आणि सहकार्याच्या आठवणी सांगितल्या.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक धुरी यांनी गावडे सर व सावंत मॅडम यांनी शाळेच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाचे विशेष कौतुक केले. शाळेतील कोणताही कार्यक्रम असो, आर्थिक अडचणी असतानाही कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडावा, यासाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासोबतच शाळेच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, असे त्यांनी सांगितले.

माजी केंद्रप्रमुख मराठे सर तसेच केंद्रप्रमुख गणेश नाईक सर यांनीही मनोगत व्यक्त करत गावडे सर व सावंत मॅडम यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्यासोबतच्या आठवणी सांगताना त्यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पिंगुळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश मसके यांनीही आपल्या मनोगतात गावडे सर व सावंत मॅडम यांच्याविषयी असलेला आदर व्यक्त केला. “या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना आपलेसे केले. त्यांचा कार्यकाळ याच शाळेत पूर्ण व्हावा, अशी पालकांसह अनेकांची मनापासून इच्छा होती,” असे त्यांनी सांगितले.

यावेळी सदाशिव गावडे सर व सावंत मॅडम यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीने दिलेल्या प्रेम व सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. निरोपाच्या क्षणी अनेक आठवणींना उजाळा देत वातावरण भावूक झाले.

कार्यक्रमाचे समालोचन काळसेकर मॅडम यांनी केले. यावेळी पालक, विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कारांची शिदोरी ठेवून निरोप घेणाऱ्या सदाशिव गावडे सर व सावंत मॅडम यांच्या कार्याला पिंगुळीकरांनी मनापासून सलाम करत त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!