महावितरणच्या कारभारावर ग्रामस्थांचा संताप
संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून केला पंचनामा
पिंगुळी : पिंगुळी-गोंधळपूर मुस्लिमवाडी येथील आयकॉन कंपनीजवळ विजेच्या खांबाला लागलेल्या विजेच्या धक्क्याने अजीम शेख यांच्या म्हशीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पिंगुळी ग्रामपंचायतीचे सरपंच अजय आकेरकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
घटनेची माहिती मिळताच सरपंच आकेरकर यांनी संबंधित यंत्रणांना दूरध्वनीवरून माहिती देत तातडीने घटनास्थळी दाखल होण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर पोलीस प्रशासन, महावितरणचे अधिकारी तसेच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
म्हशीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. महावितरणच्या वीजखांबांबाबत तसेच सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना घडू नये, यासाठी वीजवाहिन्या व खांबांची तातडीने तपासणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
यावेळी महावितरणच्या इंजिनिअर वर्षा पाटील यांनी घटनास्थळी पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. सरपंच अजय आकेरकर यांनी नागरिकांशी संवाद साधत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मध्यस्थीनंतर काही काळ निर्माण झालेला तणाव निवळला.
पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी अमित देसाई यांनी घटनास्थळी पाहणी करून मृत म्हशीचा पंचनामा केला. तसेच पोलीस पाटील सतीश माडये व शंकर सातार्डेकर यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून घटनेची माहिती घेतली.
या घटनेमुळे अजीम शेख यांच्या कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, नुकसानभरपाई मिळावी तसेच परिसरातील वीजव्यवस्था सुरक्षित करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
यावेळी अजीम शेख, फिरोज, अखलाद भाई, सलीम शेख, काश्मिरा शिरोडकर, राजा पांचाळ, रफिक खान यांच्यासह ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Subscribe










