मुंबई-गोवा महामार्गावर पणदूर येथे अपघात

दोन प्रवासी जखमी

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ तालुक्यातील पणदूर येथे आज दुपारी १२:३० च्या सुमारास भीषण अपघात झाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका बोलेरो गाडीचा ताबा सुटल्याने ती रस्त्याशेजारील ओहोळाच्या कठड्यावर जोरात आदळली. या अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरो गाडी (क्रमांक: MH 08 AX 3453) गोव्याकडून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास पणदूर येथील ओहोळावर असलेल्या पुलाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी, गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या कठड्यावर जाऊन जोरात धडकली. धडक इतकी भीषण होती की गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

चलन कारवाईच्या भीतीने ताबा सुटला?

विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा अपघात झाला, त्याच्या काही अंतरावरच पणदूर ब्रीजखाली पोलिसांचे ‘इंटरसेप्टर’ वाहन उभे होते. महामार्गावर वेगाने जाणाऱ्या वाहनांवर वेगमर्यादा ओलांडल्याप्रकरणी ही गाडी दंडात्मक (चलन) कारवाई करत होती. पोलिसांची गाडी पाहून चालकाने बोलेरोचा वेग अचानक कमी करण्याचा प्रयत्न केला असावा आणि त्याच गडबडीत गाडीचा ताबा सुटला असावा, अशी चर्चा अपघातस्थळी नागरिकांमध्ये सुरू होती.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत. महामार्गावरील वेग आणि अचानक होणाऱ्या अशा अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

error: Content is protected !!