खरीप हंगाम २०२६ : शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची अचूक नोंद करून घ्यावी

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकरी खातेदारांनी आपल्या शेतातील खरीप हंगामातील पिकांची अचूक नोंदणी गावातील नियुक्त पीक पाहणी सहाय्यकांमार्फत ‘डीसीएस एमएच’ (Digital Crop Survey Maharashtra) या मोबाईल अॅपद्वारे १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

खरीप हंगाम २०२६ साठी महसूल विभागाच्या वतीने ‘डीसीएस एमएच’ मोबाईल अॅपद्वारे ई-पीक पाहणी अर्थात डिजिटल क्रॉप सर्व्हेक्षणास सुरुवात करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या डिजिटल क्रॉप सर्व्हे मोबाईल अॅपद्वारे राज्यात दि. ११ ऑगस्ट २०२६ पासून पीक पाहणीचे काम सुरू करण्यात आले आहे. पीक पाहणीच्या अनुषंगाने सहाय्यकांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची पाहणी करूनच छायाचित्रे अपलोड करावीत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

ई-पीक पाहणीची अचूक नोंदणी झाल्यास शेतकऱ्यांना पीक विमा, पीक कर्ज तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मिळणारी शासकीय मदत व भरपाई मिळणे सुलभ होते. तसेच, शासकीय आधारभूत किमतीने (एमएसपी) शेतीमालाची विक्री करण्यासाठीही ई-पीक पाहणीची नोंद अत्यंत महत्त्वाची आहे. शेतात प्रत्यक्ष उपस्थित राहून अॅपद्वारे पिकांचे छायाचित्र अपलोड केल्यामुळे सातबारा उताऱ्यावर पिकांची अचूक व पारदर्शक नोंद होण्यास मदत होते.

तरी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील नियुक्त पीक पाहणी सहाय्यकांशी संपर्क साधून विहित मुदतीत खरीप हंगामातील भात, नागली तसेच अन्य पिकांची अचूक नोंदणी करून घ्यावी. काही अडचणी उद्भवल्यास संबंधित तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!