महिला रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात नव्याने रुजू झालेल्या डॉक्टरांचा सुरुवातीला जंगी सत्कार व स्वागत केले जाते. मात्र, हे डॉक्टर नियुक्तीच्या ठिकाणी फक्त एक दिवस थांबतात आणि दुसऱ्या दिवसापासून परिस्थिती ‘जैसे थे’ होते, असा थेट आणि गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते तथा उपतालुकाप्रमुख श्री. बाळा पावसकर यांनी केला आहे.
श्री. बाळा पावसकर यांनी दिलेल्या सविस्तर बातमीनुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हे डॉक्टर दिवसातून एखादे-दुसरेच ऑपरेशन करतात आणि ऑन-ड्यूटी असतानाच आपला उर्वरित वेळ इतर खासगी रुग्णालयांमध्ये ओपीडी (OPD) चालवण्यासाठी देतात. शासकीय सेवेत कार्यरत असताना आणि पगार सरकारी तिजोरीतून घेत असताना हे डॉक्टर ऑन-ड्यूटी खासगी रुग्णालयांना प्राधान्य देत असल्याने ग्रामीण व गरीब रुग्णांचे हाल होत आहेत.
दोन दिवसांत परिस्थिती ‘जैसे थे’
शासकीय व महिला रुग्णालयात मोठ्या आशेने डॉक्टरांचे स्वागत केले जाते, परंतु दुसऱ्याच दिवसापासून डॉक्टर अनुपस्थित राहून रुग्णांना वाऱ्यावर सोडतात.
शासकीय महाविद्यालयात केवळ नावाला उपस्थित राहून एक-दोन शस्त्रक्रिया उरकल्या जातात आणि लगेचच इतर खासगी क्लिनिक किंवा रुग्णालयांत ओपीडीसाठी हे डॉक्टर हजेरी लावतात.ग्रामीण भागातून उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यांना नाइलाजाने खासगी रुग्णालयांची पायरी चढावी लागत आहे.”शासकीय रुग्णालयांमध्ये गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, डॉक्टरांच्या या मनमानी आणि बेजबाबदार कारभारामुळे आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर गेल्याचे चित्र आहे. ऑन-ड्यूटी असताना खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या अशा डॉक्टरांवर तात्काळ कडक शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. जर प्रशासनाने या दांडीबहाद्दूर डॉक्टरांवर त्वरित चाप लावला नाही, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा श्री. बाळा पावसकर यांनी दिला आहे.
या प्रकरणामुळे आरोग्य वर्तुळात आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी खळबळ उडाली असून, वरिष्ठ अधिकारी यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Subscribe










