विविध आकर्षणांनी सजणार सोहळा
कणकवलीच्या महिलांचे लाठी-काठी व युद्धकौशल्य सादरीकरण ठरणार विशेष आकर्षण
पिंगुळी : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने पिंगुळी येथे सखेसोबती दहीहंडी मित्रमंडळ, पिंगुळी यांच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता दाभोळकर स्कूल, मुख्य पटांगण येथे हा उत्सव उत्साहात पार पडणार आहे.
सखेसोबती व सिद्धिविनायक मित्र मंडळ, पिंगुळी यांच्या सहकार्याने आयोजित या उत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील दहीहंडी पथकांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. अल्पावधीतच आयोजन करून ओढ लावणाऱ्या सखेसोबती दहीहंडी मित्रमंडळाच्या या उपक्रमामुळे दहीहंडीप्रेमींना गोविंदांच्या थरारक मानवी मनोऱ्यांचा रोमांच अनुभवता येणार आहे.
उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे मान्यवरांच्या व जिल्ह्यातील नामांकित रील स्टार यांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन, गावातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान, महिला व पुरुष ढोलपथकांचे दमदार सादरीकरण, दहीहंडीआधारित नृत्याविष्कार, पाण्याच्या वर्षावात ‘जि. जे., लाईव्ह रॅम्प शो, तसेच प्रेक्षकांसाठी विविध विशेष बक्षिसे व फटाक्यांची आतषबाजी.
कणकवलीच्या महिलांचे लाठी-काठी व युद्धकौशल्य सादरीकरण
या उत्सवातील विशेष आकर्षण म्हणून कणकवलीच्या महिलांचे लाठी-काठी व युद्धकौशल्याचे थरारक सादरीकरण पाहायला मिळणार आहे. महिलांच्या धाडस, आत्मविश्वास आणि युद्धकौशल्याची झलक दाखविणारे हे सादरीकरण उपस्थित प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेणार आहे.
याशिवाय विविध पुरुष व महिला दहीहंडी पथकांचा थरार, अवकाशातून पुष्पवृष्टी, विविध शाळांमधील शस्त्रकला प्रदर्शन आणि महिलांसाठी विशेष दहीहंडी फोडणे स्पर्धा, अशी अनेक आकर्षणे उत्सवात पाहायला मिळणार आहेत.
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह, गोविंदांच्या थरारक मनोऱ्यांचा रोमांच, ढोलपथकांचा गजर, सांस्कृतिक कार्यक्रम आणि कणकवलीच्या महिलांचे युद्धकौशल्य असे विविध रंगांनी सजलेले भव्य आयोजन पिंगुळीत होणार आहे.
या भव्य दहीहंडी उत्सवाचा आनंद घेण्यासाठी पिंगुळी परिसरातील नागरिकांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहीहंडीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सखेसोबती दहीहंडी मित्रमंडळ, पिंगुळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Subscribe









