२५ वर्षीय तरुणीचा मृत्यू
दोन दुचाकींची धडक; रस्त्याच्या उजव्या बाजूला फेकली गेली असता कंटेनरच्या गार्डवर आदळली
सावंतवाडी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वेत्ये-खांबलवाडी येथे सोमवारी झालेल्या भीषण तिहेरी अपघातात गोव्यातील एका २५ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला. शोभा फर्नांडिस (वय २६, रा. गोवा) असे मृत तरुणीचे नाव असून, या अपघातात दुचाकीवरील इतर दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी जुपिटर चालकाविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी डेनसन उर्फ डोनाल्ड लिबर्टस डीनिस (वय २७, रा. कुंकोलीम, साऊथ गोवा) हे आपली मैत्रीण शोभा फर्नांडिस हिच्यासह रॉयल एनफिल्ड दुचाकीने (GA 08 AL 9055) महामार्गावरून जात होते. वेत्ये खांबलवाडीजवळ पुढे जाणाऱ्या जुपिटर दुचाकीच्या (MH 07 AM 8155) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे अचानक ब्रेक दाबला. यामुळे मागोमाग येणाऱ्या रॉयल एनफिल्डची जुपिटरला जोरदार धडक बसली.
या धडकेमुळे रॉयल एनफिल्डच्या मागे बसलेली शोभा फर्नांडिस ही रस्त्याच्या उजव्या बाजूला फेकली गेली आणि त्याच वेळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरच्या बाजूच्या लोखंडी गार्डला जोरात आदळली. यात तिच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर फिर्यादी डेनसन, जुपिटर चालक प्रदीप रामचंद्र वेंगुर्लेकर (वय ३७, रा. सातोसे लिंगेवाडी) आणि जुपिटरवरील सहप्रवासी दिगंबर मोहन सावंत हे जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत, परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी शेलार आणि पोलीस निरीक्षक मगदूम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी जुपिटर चालक प्रदीप वेंगुर्लेकर याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस हवालदार पाटील अधिक तपास करत आहेत.


Subscribe









