चालक-वाहकांच्या ४५७ जागा रिक्त असल्याने प्रवाशांचे हाल
कणकवली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाला सध्या रिक्त पदांचे ग्रहण लागले असून, चालक आणि वाहकांच्या सुमारे ४५७ जागा रिक्त असल्याने एसटी वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. प्रशासकीय आकडेवारीनुसार, चालकांची ८९२ मंजूर पदे असताना त्यापैकी ४४१ पदे रिक्त आहेत, तर वाहकांच्या ८७४ मंजूर पदांपैकी ५१३ पदे रिक्त आहेत. जरी चालक-कम-वाहक पदावरील कर्मचारी कार्यरत असले, तरी एकूण रिक्त पदांमुळे गाड्यांच्या फेऱ्या रद्द होणे किंवा विलंबाने धावणे अशा समस्यांना प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे.
विभागातील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे कार्यरत असलेल्या चालक आणि वाहकांवर कामाचा प्रचंड ताण येत असून, त्यांना सतत ‘ओव्हरटाईम’ करावा लागत आहे. विशेष म्हणजे, २०१६ पासून महामंडळात नियमित भरती झालेली नाही आणि ऑक्टोबर २०२५ मध्ये जाहीर झालेली कंत्राटी भरती प्रक्रियाही अद्याप कागदावरच आहे. १५ एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होण्याचे आश्वासन दिले गेले होते, मात्र अद्याप कोणतीही हालचाल न झाल्याने रिक्त पदांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे कार्यशाळेतील कामांवरही परिणाम होत असून कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि मानसिक स्थिती खालावत चालली आहे.
मनुष्यबळासोबतच सिंधुदुर्ग विभागात नवीन बसेसचीही मोठी कमतरता भासत आहे. विभागाच्या ताफ्यातील ३६० ते ३७० बसेसपैकी बहुतांश गाड्या जुन्या आणि नादुरुस्त आहेत. गेल्या पाच वर्षांत ताफ्यात ७० नवीन गाड्या दाखल झाल्या असल्या तरी त्यापेक्षा दुप्पट गाड्या भंगारात निघाल्या आहेत. परिणामी, महामंडळाला पुन्हा उर्जितावस्थेत आणण्यासाठी तातडीने पदभरती करणे आणि नवीन बसेस उपलब्ध करून देणे हाच एकमेव पर्याय उरला आहे, अन्यथा जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


Subscribe










