कमी किंमतीच्या निविदाकाराला बेकायदा बाद करून मार्जितल्या पुरवठादाराला चढ्या किंमतीने निविदा मंजुरीचा घातला जातोय घाट
वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारातील काळं-बेरं थांबणार कधी?
प्रसाद गावडे यांचा सवाल
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये भ्रष्टाचाराची मालिका सुरूच असून 66 लाख रुपये एवढ्या सरासरी दराने भरलेल्या निविदाकाराची निविदा बेकायदेशीर पद्धतीने व कोणतेही कारण न देता अपात्र ठरवून 99 लाख एवढ्या चढ्या दराने भरणा केलेल्या मार्जितल्या पुरवठादाराला टेंडर देण्यासाठी शासनाचे नियम धाब्यावर बसवून निविदा मंजूर करण्याचा गंभीर प्रकार उघसकीस आला आहे. विशेष बाब म्हणजे रुग्णालयीन खरेदी समितीला याचा थांगपंत्ताच लागू दिलेला नसल्याचे निष्पन्न झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाचा भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. यापूर्वी लॉन्ड्री व आहार सेवा पुरवठा सेवेत अनियमितता व दोष आढळून देखील त्यावर कारवाई नाही मात्र अर्थपूर्ण संबंधांमधून 56 लाख रुपयांचे देयक टक्केवारी घेऊन बहाल करण्यात आले होते. निविदा प्रक्रियेतील घोटाळ्यावर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालक कार्यालयाकडून चौकशी प्रक्रिया चालू झालेली असून चौकशी करणारे अधिकारी देखील जिल्ह्यात हजर झाले आहेत. शासकीय खरेदी प्रक्रिया संदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सूचना व नियमांना तिलांजली देऊन ठेकेदारांशी साटेलोटे करून शासनाचा निधी हडप करू पाहणाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हावी यासाठी दिवाळीनंतर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांच्या दालनात आत्मक्लेष आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेना कामगार सेनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिला असून वैद्यकीय रुग्णालयात सर्वसामान्यांच्या पैशांवर डल्ला मारण्याचे प्रकार वारंवार उघडकीस येत असून जिल्हा प्रशासन याकडे डोळसपणे पाहण्याचे आवश्यकता आहे. आरोग्य सेवेच्या नावाखाली महाविद्यालयाकडील अधिकारी व कर्मचारी ठेकेदाराशी संगनमताने स्वतःच्या तुंबड्या भरण्याचे काम करत असून जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गंभीरतापूर्वक लक्ष देणे आवश्यक असल्याची मागणी प्रसाद गावडे यांनी केली प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.














 
	

 Subscribe
Subscribe









