दोडामार्ग तालुक्यात अवकाळी पाऊस

शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात अनेक ठिकाणी ढगांचा गडगडासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली तर काही प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. यावेळी केर गावात मोठ्या प्रमाणात गाराही बरसल्या. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने तालुकावासिय मात्र सुखावले आहेत. तर काजु आंबा बागायतीचे नुकसान झाले आहे तर घोटगे गावातील हजारो केळी उन्मळून पडून लाखो रुपयांची नुकसानी झाली आहे यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

वातावरणातील बदलामुळे मागील काही दिवसांपासून वातावरणातील उष्मा वाढला होता. गरमीने तालुकावासिय हैराण झाले होते. गेल्या चार दिवसांपासून दुपारच्या सत्रात ढग दाटून येत होते. त्यामुळे उकाडा अधिकच वाढत होता. शनिवारी सायंकाळच्या सुमारास तालुक्यात काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.

रविवारी दुपारी काहीसे ढगाळ वातावरण निर्माण झाले. सायंकाळी ४ वा.च्या सुमारास ढगांचा गडगडाट सुरू झाला अन् काही वेळातच अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. यावेळी जोरदार वाराही सुटला होता. दरम्यान काही ठिकाणी गारा बरसल्या. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. दुचाकीस्वारांनी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेत पावसात भिजण्यापासून बचाव केला. पावसामुळे तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाला होता. तर तालुक्यात आज बाजार असल्याने व्यापारी वर्गाची तारांबळ उडालेली पाहायला मिळाली.

error: Content is protected !!