३१ मतांची आघाडी घेत विजय; पिंगुळी ग्रामसभेत रंगली चुरशीची निवडणूक
पिंगुळी : पिंगुळी गावातील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भगवान (अण्णा) रणसिंग यांनी पुन्हा एकदा बाजी मारली. पिंगुळी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित ग्रामसभेत झालेल्या या निवडणुकीत रणसिंग यांनी ३१ मतांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला.
अध्यक्षपदासाठी भगवान रणसिंग आणि दीपक धुरी आमनेसामने होते. ग्रामसभेच्या अध्यक्षांनी निवडणुकीची घोषणा केल्यानंतर मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण ११२ ग्रामस्थांनी मतदान केले. त्यापैकी भगवान रणसिंग यांना ६५ मते, दीपक धुरी यांना ३४ मते, तर १३ मते नोटाला मिळाली.
अशाप्रकारे भगवान रणसिंग यांनी ६५ मते मिळवत दीपक धुरी यांच्यावर ३१ मतांची स्पष्ट आघाडी घेत विजय संपादन केला. निकाल जाहीर होताच उपसरपंच मंगेश मसके यांनी भगवान रणसिंग यांच्या विजयाची घोषणा केली.
भगवान (अण्णा) रणसिंग यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, गावातील तंटे सामोपचाराने मिटवून गावात शांतता, सलोखा आणि एकोपा राखण्याची जबाबदारी आता पुन्हा त्यांच्या खांद्यावर आली आहे.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच अजय आकेरकर, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, शशांक पिंगुळकर, सागर रणसिंग, विठ्ठल सिंगनाथ, निलेश प्रभू, पोलीस पाटील सतीश माडये, शंकर सातार्डेकर, बाबली पिंगुळकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


Subscribe








