२० वर्षांपासून उभा असलेला रोड रोलर गायब

कुडाळमधील महिला कर्मचारी निलंबित

ओरोस : कुडाळ पंचायत समिती आवारातून रोड रोलर गायबप्रकरणी अखेर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. कुडाळ बांधकाम उपविभागाच्या कनिष्ठ सहाय्यक शिल्पा वासुदेव वेंगुर्लेकर उर्फ दीक्षा दत्ताराम माळकर यांना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी शासकीय सेवेतून निलंबित केले आहे.

संबंधित रोड रोलरचे सन २००५ मध्येच निर्लेखन (स्क्रॅप) करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरची पुढील लिलाव प्रक्रिया वेळेत न राबविल्यामुळे हा रोड रोलर तब्बल २० वर्षांपासून पंचायत समितीच्या आवारातच धूळ खात पडून होता. दोन महिन्यांपूर्वी हा रोड रोलर आवारातून अचानक गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. दरम्यान, हा शासकीय रोड रोलर यंत्रणेला अंधारात ठेवून एका भंगारवाल्याला परस्पर विकण्यात आल्याचा गंभीर आरोपही याप्रकरणी करण्यात आला होता.

हा संवेदनशील मुद्दा कुडाळ पंचायत समितीच्या मासिक सभेत आणि जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या बैठकीत चांगलाच गाजला होता. लोकप्रतिनिधींच्या तक्रारींनंतर प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी केली. या चौकशीत सदर रोड रोलरची संपूर्ण जबाबदारी कनिष्ठ सहाय्यक दीक्षा माळकर यांच्यावर निश्चित करण्यात आली. त्यानुसार, महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील कलम ३ अन्वये त्यांच्यावर शिस्तभंग कारवाई प्रस्तावित करून त्यांना निलंबित करण्यात आले असून, निलंबन काळात त्यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी कार्यालयात रवानगी करण्यात आली आहे.

error: Content is protected !!