वीज ग्राहक संघटनेची अधीक्षक अभियंता कार्यालयाला धडक

वीजपुरवठा सुरळीत ठेवू; अधीक्षक अभियंता यांची ग्वाही

कुडाळ : येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज पुरवठा अखंडित राहावा आणि प्रलंबित मागण्या सुटाव्यात यासाठी ‘सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना’ आणि ‘आंब्रड ग्रामपंचायत’ महावितरणच्या कारभाराविरोधात आक्रमक झाल्या आहेत. आंब्रड गावात मार्च महिन्यापासून सुरू असलेल्या विजेच्या खेळखंडोब्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी येत्या ३० मे पर्यंत समस्या न सुटल्यास बेमुदत उपोषण करण्याचा आणि महावितरणचे काम बंद पाडण्याचा थेट इशारा दिला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक घेत महावितरणची बाजू मांडली व ग्राहकांच्या सर्व शंकांचे निरसन करत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले.

१. वीज ग्राहक संघटनेच्या मागण्या

मान्सूनपूर्व कामे आणि स्मार्ट मीटरला विरोध
सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेने अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांना दिलेल्या निवेदनात पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील मुख्य ३३ केव्ही, ११ केव्ही, एल.टी. आणि एन.टी. वाहिन्यांच्या मार्गात येणाऱ्या धोकादायक झाडांच्या फांद्या तातडीने छाटण्याची मागणी केली. तसेच पावसाळ्यात ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रकार टाळण्यासाठी सर्व रोहित्रांची मान्सूनपूर्व तपासणी व दुरुस्ती युद्धपातळीवर करण्याची मागणी केली.
याचवेळी संघटनेने ‘स्मार्ट मीटर’ सक्तीला तीव्र विरोध दर्शवला. वीज कायदा २००३ च्या अधिनियम क्र. ४७ (५) नुसार ग्राहकांना पसंतीचे मीटर बसवण्याचा हक्क आहे. हजारो ग्राहकांनी स्मार्ट मीटरला लेखी विरोध केला असून महावितरणने या अर्जांची दखल घेऊन डिजिटल इलेक्ट्रॉनिक मीटर बसवावेत, अशी मागणी संघटनेने केली.

२. आंब्रड ग्रामपंचायतीचा निर्वाणीचा इशारा; ३० मे नंतर आंदोलन!

आंब्रड परिसरात मार्च महिन्यापासून सातत्याने कमी दाबाने आणि खंडित वीज पुरवठा होत असल्याने नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. कसाल फिडरवरून सोनवडे पर्यंत होणाऱ्या या ढिसाळ पुरवठ्यामुळे ग्राहकांची महागडी उपकरणे खराब होत आहेत. वारंवार मागणी करूनही येथे दुसऱ्या वायरमनची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
ग्रामपंचायतीने व आबा मुंज यांनी अधीक्षक अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट इशारा दिला आहे की, येत्या ३० मे पर्यंत दुसरा वायरमन न दिल्यास आणि वीज पुरवठा सुरळीत न केल्यास आंब्रडवासीय महावितरण कार्यालयासमोर तीव्र उपोषण करतील. तसेच मागण्यांची दखल न घेतल्यास आंब्रड जिल्हा परिषद मतदारसंघातील महावितरणच्या एकाही कर्मचाऱ्याला काम करू दिले जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

३. अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांचे स्पष्टीकरण आणि योजनांची माहिती.

या सर्व तक्रारींवर आणि मागण्यांवर महावितरणचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी सकारात्मक पावले उचलत खालीलप्रमाणे सविस्तर स्पष्टीकरण व आश्वासन दिले:
स्मार्ट मीटर सक्तीचे नाही, फायद्याचे: “स्मार्ट मीटर हे ग्राहकांच्या फायद्याचेच असून, ग्राहक कुठल्या वेळेत विजेचा किती वापर करतो त्यानुसार त्याचे बिल ठरेल. सकाळी ९ ते दुपारी ५ या वेळेत वीज वापरल्यास प्रति युनिट ८० पैसे रिबेट (सवलत) मिळणार आहे. याबाबत कोणाच्या शंका असल्यास महावितरण त्याचे निरसन करेल.”
अधिकाऱ्यांनी फोन न उचलण्याच्या तक्रारीवर राख यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक सामान्य जनतेसाठी वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले.
ग्राहकांनी कोणत्याही तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक १९१२ किंवा कंट्रोल रूम क्रमांक ७८७५७६५०१९ वर फोन करावा. या तक्रारी ऑनलाइन नोंदवल्या जात असल्याने त्या वेळेत सुटतील, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच अचूक माहिती व एसएमएस अलर्ट मिळण्यासाठी ग्राहकांनी वीजबिलावर आपले मोबाईल नंबर अपडेट करावेत, असे सांगितले.
‘सोलर घर’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन: ३ किलोवॅटपर्यंतच्या सोलर प्रकल्पांना कोणतेही शुल्क नाही. तर स्मार्ट स्कीम अंतर्गत ५० हजार रुपये किमतीचा १ किलोवॅट सोलर पॅनल विथ बॅटरी सेट अत्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. यात **बीपीएल (BPL) ग्राहकांसाठी फक्त २,००० रुपये, एससी-एसटी (SC/ST) ग्राहकांसाठी ५,००० रुपये, तर सर्वसाधारण (General) ग्राहकांसाठी १०,००० रुपये खर्च आहे.
ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा.
“आपण आहात तर आम्ही आहोत..
“वीज ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे. आपण आहात तर आम्ही आहोत. महावितरणची संपूर्ण टीम ग्राहकांच्या सेवेसाठी १०० टक्के उपलब्ध आहे,” असे भावनिक आवाहन अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी शेवटी केले.

बैठकीला प्रमुख लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या महत्त्वपूर्ण बैठकीला आणि निवेदन सादरीकरणाच्या वेळी वीज ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय लाड, संघटना समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, सचिव तुकाराम म्हापसेकर, दोडामार्ग सचिव भूषण सावंत उपस्थित होते.
तसेच या मागणीला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोणकर, जिल्हा उपाध्यक्ष मेघनाथ धुरी, जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर, संजय गावडे, सुदन कवठणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य आबा मुंज, पंचायत समिती सदस्य कृष्णा धुरी, आंब्रडच्या सरपंच मानसी कदम, स्वप्नील मुंज, पांडुरंग दळवी आणि महेंद्र कदम उपस्थित होते. महावितरणच्या वतीने वीज अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख,अधिकारी वनमोरे, विश्वजीत भोसले जनसंपर्क अधिकारी यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी आणि अनेक वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!