उत्तर प्रदेशातील संशयितावर गुन्हा दाखल
१० वर्षांचा विश्वास ठरला फोल
कुडाळ शहरातील ‘धैर्यशील प्राईड’ येथील ‘धैर्यशील डेअरी फार्म’मध्ये ९३ हजार ७०० रुपयांची चोरी झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दुकानातील नोकर मनीष हरदेव यादव (मूळ रा. उत्तर प्रदेश) याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला असून चोरीनंतर तो फरार झाला आहे. डेअरी मालक रणजीतसिंग जयसिंग राणे (रा. नेरूर-देऊळवाडा) यांनी या संदर्भात कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी संशयितावर गुन्हा नोंदवला आहे.
मनीष यादव हा गेल्या दहा वर्षांपासून राणे यांच्या डेअरीत दूध व दही विक्रीचे काम करत होता. १ ते ४ एप्रिल २०२६ या कालावधीत त्याच्याकडे दूध खरेदीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या काळात गोळा झालेली ९३ हजार ७०० रुपयांची रक्कम स्थानिक शेतकऱ्यांना देण्यासाठी राणे यांनी मनीषकडे दिली होती. मात्र, ११ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास ही रक्कम घेऊन मनीषने पलायन केले. १२ एप्रिलला सकाळी दूध देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना मनीष न भेटल्याने आणि त्याचा मोबाईल बंद असल्याने मालक राणे यांनी शोध घेतला असता हा प्रकार समोर आला.
या घटनेबाबत अधिक माहिती घेण्यासाठी राणे यांनी मनीषच्या मुंबईत राहणाऱ्या भावाशी संपर्क साधला. तेव्हा मनीष उत्तर प्रदेशला जाण्यासाठी निघाल्याचे सांगण्यात आले, मात्र त्याच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यानेच ही रक्कम चोरल्याचे स्पष्ट झाले. १० वर्षांपासून विश्वासाने काम करणाऱ्या नोकरानेच अशा प्रकारे हात साफ केल्याने परिसरात चर्चा सुरू आहे. सध्या कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सचिन गवस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Subscribe










