३६ वर्षीय विवाहिता बेपत्ता

कणकवली कलमठ येथील घटना

कणकवली : तालुक्यातील कलमठ – बिडयेवाडी येथील सौ. अंकिता प्रशांत रसाळ (वय ३६) या १९ एप्रिल रोजी सायंकाळपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. त्या सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्या आहेत. या संदर्भात त्यांचे पती प्रशांत जयंत रसाळ (वय ३९) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात रीतसर खबर दिली असून पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंकिता आणि त्यांचे पती प्रशांत यांच्यात काही घरगुती कारणावरून किरकोळ भांडण झाले होते. याच वादाच्या रागातून अंकिता या घरातून निघून गेल्या असाव्यात, अशी शक्यता त्यांच्या पतीने दिलेल्या खबरीत व्यक्त केली आहे. १९ एप्रिलच्या सायंकाळपासून त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला, मात्र अद्याप त्यांचा कोणताही पत्ता लागलेला नाही. त्यामुळे कुटुंबियांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

बेपत्ता असलेल्या अंकिता रसाळ यांचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे: रंग गोरा, उंची ५ फूट ४ इंच, मध्यम बांधा, चेहरा उभट, केस काळे व लांब आहेत. घरातून निघताना त्यांच्या अंगात शेवाळी रंगाचा पंजाबी ड्रेस होता, गळ्यात सोन्याचे लहान मंगळसूत्र आणि हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या आहेत. अशा वर्णनाची कोणतीही महिला आढळल्यास तात्काळ कणकवली पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!