
पूर्वओळख नसताना महिलेचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न
तरुणाला न्यायालयाचा दणका
ओरोस : रस्त्याने पायी जाणाऱ्या एका महिलेचा दुचाकीवरून पाठलाग करत तिला नाहक त्रास देणाऱ्या कलमठ येथील तरुणाला न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. आरोपी संकेत मिलिंद महेंद्रकर (वय वर्ष – रा. कलमठ सुतारवाडी, ता. कणकवली) याला एका महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा आणि २५ हजार रुपयांचा रोख दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त आठ दिवसांची साधी कैद भोगावी लागणार असल्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी ए. जी. देशिंगकर यांनी दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ७ सप्टेंबर २०२४ रोजी आपले नेहमीचे काम संपवून घराच्या दिशेने जात होती. त्यावेळी आरोपी संकेत महेंद्रकर याने दुचाकीवरून येऊन कोणतीही पूर्वओळख नसताना महिलेला गाठले आणि “तुला ओरोस फाटा येथे सोडू का?” अशी विचारणा केली. महिलेने त्याला थेट नकार दिला असता, त्याने पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारत तिचा रस्ता अडवण्याचा व पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.
वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे संबंधित महिलेने थेट सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७८ (१) अंतर्गत पाठलाग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र दळवी यांनी तपास पूर्ण करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयात सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाकडून एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी अभियोक्ता शिल्पा गोबाडे आणि गुरुदास माजगावकर यांनी पीडित महिलेची बाजू मांडत सक्षम युक्तिवाद केला. हा युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली. या खटल्याच्या कामकाजात महिला पोलिस शिपाई शिंदे यांनी पैरवी अधिकारी म्हणून सहकार्य केले. भररस्त्यात महिलांची छेड काढणाऱ्या आणि पाठलाग करणाऱ्या प्रवृत्तींना या निकालामुळे मोठा चाप बसेल, असे मानले जात आहे.



Subscribe










