
२५ वर्षीय संशयित ताब्यात
कुडाळ : कुडाळ शहरातील कविलकाटे – बावकरवाडी येथील ३४ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरून नेल्या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी रोहीत राघो गवस (२५, रा. सोनवडे तर्फ हवेली चिपकरवाडी) याला ताब्यात घेत शनिवारी रात्री अटक केली होती. त्याला रविवारी येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली.
याबाबतची फिर्याद विमल विलास मातोंडकर (३४, रा. कुडाळ कविलकाटे-बावकरवाडी) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली होती. मातोंडकर या शनिवारी सकाळी ६ वाजण्याच्या घरातून कुडाळ येथे हॉटेलमध्ये कामासाठी जाण्यासाठी निघाल्या. काम आटोपून त्या सकाळी ९.३० वा. च्या सुमारास कुडाळ रेल्वे स्थानकाजवळून रेल्वे ट्रॅक ओलांडून आपल्या घरी चालत जात होत्या. अचानक एका अनोळखी व्यक्तीने त्यांना रेल्वे ट्रॅकवरून खाली ढकलण्याचा प्रयत्न केला. तसेच त्या संशयिताने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. मातोंडकर यांनी त्याला जोरदार प्रतिकार केला आणि आरडाओरड केल्याने त्याने त्यांना चाकूचा धाक दाखविला. मात्र, नागरिकांनी तेथे धाव घेत असल्याचे पाहून त्याने मंगळसूत्र घेऊन पळ काढला.
सदर चोरी करणाऱ्याचा शोध घेत संशयित रोहित गवस याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर मंगळसूत्र त्याने हिसकावून घेतले आणि नागरिकांनी पाठलाग करताच एका ठिकाणी लपवून ठेवल्याचे असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले. सदर मंगळसूत्र व धाक दाखविण्यासाठी वापरलेला चाकू संशयित रोहित याच्याकडून हस्तगत करण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गुरुदास दास पाडावे करीत आहेत.



Subscribe









