पणदूर – सुकळवाड मार्गावर दुतर्फा वाढलेली झाडी अखेर स्वच्छ

दादा साईल यांच्या पत्रानंतर प्रशासन अँक्टिव्ह मोडवर

कुडाळ : पणदूर – सुकळवाड मार्गाची पावसाळी पूर्व साफसफाई केली नसल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर झाडी वाढली होती. त्यामुळे वाहनचालकांना या मार्गावरून वाहने चालवताना नेहमी मनस्ताप सहन करावा लागत होता. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधल्यानंतर तत्काळ कार्यवाही करण्यात आली असून वाहनचालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

पणदूर – सुकळवाड मार्गावर दुतर्फा मोठ्या प्रमाणावर झाडी वाढली होती. त्यामुळे या मार्गावरून वाहने चालवताना कसरत करावी लागत होती. शिवाय वाढलेल्या झाडीमुळे समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची देखील दाट शक्यता होती. शिवाय गणेश चतुर्थीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून या काळात वाहनांची रहदारी वाढल्यामुळे अपघात होण्याची शक्यता सर्वात जास्त होती. ही बाब लक्षात घेत जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे कार्यतत्पर उपाध्यक्ष दादा साईल यांनी पत्राद्वारे सार्वजनिक विभागाचे लक्ष वेधले होते. दादा साईल यांच्या पत्रानंतर प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करत रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी स्वच्छ केली. त्यामुळे वाहनचालकांचा प्रवास सुखकर होत असून समाधानाचे स्वर उमटत आहेत.

error: Content is protected !!