
जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन
पिंगुळी : कुडाळ–वेंगुर्ला रस्त्यावर अनेक ठिकाणी जीर्ण व धोकादायक झाडे असून, पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे ही झाडे किंवा त्यांच्या मोठ्या फांद्या रस्त्यावर कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर कुडाळ–वेंगुर्ला मार्गावरील सर्व जीर्ण व धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून त्यांची तातडीने तोडणी करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम गणेश सडवेलकर यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, कुडाळ यांच्याकडे लेखी निवेदन साद केले आहे.
कुडाळ–वेंगुर्ला हा महत्त्वाचा व सतत वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात जुनी झाडे असून, काही झाडे जीर्ण अवस्थेत आहेत. पावसाळ्यात जोरदार वारा व मुसळधार पावसामुळे अशी झाडे रस्त्यावर पडल्यास वाहतूक विस्कळीत होण्याबरोबरच गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक झाडांची पाहणी करून आवश्यक ती प्रतिबंधात्मक कार्यवाही तातडीने करण्यात यावी, अशी मागणी सडवेलकर यांनी निवेदनातून केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या निवेदनाची दखल घेऊन कुडाळ–वेंगुर्ला मार्गावरील धोकादायक झाडांचा सर्व्हे करून तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



Subscribe









