
आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
कुडाळ : सांगिर्डेवाडी येथील कुडाळ नगरपंचायतीच्या कचरा डेपोला आज दुपारी अडीचच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. आगीचे स्वरूप अत्यंत रौद्र असून धुराचे लोट परिसरात पसरले आहेत. ही आग आटोक्यात आणण्यासाठी नगरपंचायत प्रशासन आणि अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी अडीच वाजता कचरा डेपोतून धूर येण्यास सुरुवात झाली आणि काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. कचऱ्याचे ढीग असल्याने आगीचा प्रसार वेगाने झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याचे फवारे मारले जात आहे.
आगीची भीषणता पाहून कुडाळच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, नगरसेविका संध्या तेरसे, नगरसेवक निलेश परब आणि नगरसेविका श्रेया गावंडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. लोकप्रतिनिधींनी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आगीचा धूर आजूबाजूच्या लोकवस्तीत पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला असून, आग लवकरात लवकर विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, उन्हाची तीव्रता आणि वाऱ्याचा वेग यामुळे आग विझवताना अडचणी येत असल्याचे समजते.


Subscribe










