
सिंधुर्दुर्गनगरी : जिल्ह्यातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर काही रस्त्यांवर वेग मर्यादा कमी करण्यासाठी प्रस्ताव तयार करून राज्य पातळीवरील यंत्रणेकडे मान्यतेसाठी पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. तसेच कुडाळसह इतर शहरांमध्ये बायपास मार्ग निश्चित करून अवजड वाहतूक शहराबाहेर वळविण्यासाठीही वाहतूक विभागाने प्रस्ताव सादर करावेत, असे त्यांनी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत स्पष्ट केले.
या बैठकीत अपघातांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अपघातांची कारणे, त्यामागील तांत्रिक बाबी आणि त्यावरील उपाययोजना यांचे विश्लेषण करण्यात आले. कणकवली येथील हळवळ फाटा परिसरातील रस्ता सुरक्षा उपाययोजनांचा आढावा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सादर करण्यात आला. यासोबतच करुळ घाटातील रस्ते सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी वाहतूक शाखा, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बाबींचे बारकाईने परीक्षण करत जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागाने सुचविलेल्या सुधारणा तातडीने अंमलात आणण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. संबंधित रस्त्यावर वेग मर्यादा कमी करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव राज्य नियामक मंडळाकडे पाठविण्याची कार्यवाहीही गतीने करण्याचे सांगितले. शहरांमधील वाहतूक कोंडी कमी करून अपघात नियंत्रणात ठेवण्यासाठी अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
बैठकीच्या प्रारंभी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या रस्ता सुरक्षा उपाययोजनांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या उपाययोजनांमुळे सन २०२५ मध्ये मृत्यू संख्येत ९ टक्के घट झाली असून अपघात संख्येत १६ टक्क्यांची लक्षणीय घट झाली आहे. तसेच चालू वर्षाच्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांतही अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हा प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे रस्ता सुरक्षा व्यवस्थेत सकारात्मक बदल होत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.


Subscribe










