‘एक राखी व्यसनमुक्तीची… एक राखी पर्यावरणाची… एक राखी संस्कृतीच्या रक्षणाची!’

तळेरे येथे इको-फ्रेंडली राखी निर्मिती कार्यशाळेतून सामाजिक बांधिलकीचा संदेश

तळेरे : रक्षाबंधनाच्या पवित्र सणाला सामाजिक जाणीव आणि पर्यावरण संवर्धनाची जोड देत सिंधू फाउंडेशन आणि श्री क्लासेस, तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला इको-फ्रेंडली राखी बनविण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली.

सिंधू फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रावणी मदभावे यांच्या संकल्पनेतून गेल्या १६ वर्षांपासून रक्षाबंधनाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणारा हा उपक्रम राबविला जात आहे. या सामाजिक चळवळीला डॉ. अनिल नेरुरकर यांचे मार्गदर्शन व महत्त्वपूर्ण योगदान लाभले आहे.

भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाची सांगड समाजाचे रक्षण करणाऱ्या घटकांशी घालण्याची अभिनव संकल्पना या उपक्रमामागे आहे. सुरुवातीला ‘एक राखी व्यसनमुक्तीची’ या संकल्पनेतून प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना राखी बांधून व्यसनाधीनतेविरोधातील नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा संदेश देण्यात आला. तसेच पत्रकारांना राखी बांधून व्यसनांची दाहकता आणि त्याचे दुष्परिणाम प्रसारमाध्यमांतून अधिक प्रभावीपणे जनतेसमोर आणण्याचे आवाहन करण्यात आले.

यंदाच्या उपक्रमाची सुरुवात रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला घेण्यात आलेल्या राखी निर्मिती कार्यशाळेने झाली. या कार्यशाळेत पर्यावरणपूरक बिया, सुंभ, कापूस, ज्यूट, नैसर्गिक सजावटीचे साहित्य आणि पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा वापर करून विद्यार्थ्यांनी आकर्षक राख्या तयार केल्या.

कार्यशाळेत श्रीमती मनस्वी तळेकर यांच्या श्री क्लासेसमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच श्रावणी कम्प्युटर, तळेरेच्या विद्यार्थिनी पूर्वा घोणे, साक्षी ईळकर आणि मयुरी सुतार यांनी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या सहभागातून सणासोबत पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.

याबाबत श्रावणी मदभावे म्हणाल्या, “सोळा वर्षांपूर्वी ‘एक राखी व्यसनमुक्तीची’ या संकल्पनेतून सुरू झालेला हा प्रवास आज ‘एक राखी व्यसनमुक्तीची, एक राखी पर्यावरणाची आणि एक राखी संस्कृतीच्या रक्षणाची’ या व्यापक विचारापर्यंत पोहोचला आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि समाजातील विविध घटकांच्या सहभागातून ही चळवळ अविरत सुरू आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. समाजाच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम इतकी वर्षे सातत्याने साकार होऊ शकला.”

रक्षाबंधनाच्या दिवशी कार्यशाळेत तयार केलेल्या या राख्या प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच समाजासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या आणि सामाजिक उपक्रमांना सहकार्य करणाऱ्या व्यक्तींना बांधण्यात येणार आहेत.

नात्यांचे बंध जपत समाज, पर्यावरण आणि संस्कृतीच्या रक्षणाची जबाबदारी अधोरेखित करणारा हा उपक्रम रक्षाबंधनाला एका व्यापक सामाजिक चळवळीचे स्वरूप देत आहे.

error: Content is protected !!