प्रसाद दाभोलकर प्रथम, स्वप्नील धुरी द्वितीय
पिंगुळी : पारंपरिक खेळाला आधुनिक व्यासपीठ देत पिंगुळी बॉईज ग्रुप पुरस्कृत उत्तम गावडे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय भव्य नारळ लढवणे स्पर्धेला पिंगुळीत तुफान प्रतिसाद मिळाला. स्पर्धेच्या निमित्ताने पिंगुळीतील म्हापसेकर तिठा परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. त्यापूर्वी शिवप्रतिमेला हार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर, पिंगुळी पंचायत समिती सदस्या ममता राऊळ, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण, प्रकाश गावडे, रफिक खान, सत्यवान हरमलकर, विकास पाटकर, मंडळाचे संस्थापक उत्तम गावडे, संदीप गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी नारळ लढवणे या पारंपरिक खेळाचे महत्त्व अधोरेखित करत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. प्राजक्ता शिरवलकर तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर यांनी मनोगत व्यक्त करत आयोजकांचे कौतुक केले.
चुरशीच्या लढतीत प्रसाद दाभोलकर अव्वल
जिल्हास्तरीय या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतल्याने संपूर्ण स्पर्धेत चुरस पाहायला मिळाली. अखेर कोचरा येथील प्रसाद दाभोलकर यांनी प्रथम क्रमांक पटकावत ११ हजार १११ रुपयांचे रोख पारितोषिक आणि मानाचा चषक पटकावला. तर स्वप्नील धुरी यांनी द्वितीय क्रमांक मिळवत ५ हजार ५५५ रुपयांचे पारितोषिक मिळवले.
प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मंगेश श्रीकृष्ण प्रभू (भाऊ) व रफिक खान, पिंगुळी यांच्या वतीने देण्यात आले. प्रथम क्रमांकाचा चषक कौस्तुभ विकास पाटकर यांच्या वतीने देण्यात आला. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक राजा मुंडये यांच्या वतीने, तर चषक कौस्तुभ विकास पाटकर यांच्या वतीने देण्यात आला.
या संपूर्ण स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अश्विन पालकर, दिनार चव्हाण, संतोष गावडे, अनिकेत गावडे, तेजस गावडे, संदीप कामत, संतोष वारंग, जितू डिचोलकर, प्रसाद गावडे, राजा मुंडये यांच्यासह उत्तम गावडे मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
ग्रामीण भागातील पारंपरिक नारळ लढवणे या खेळाला जिल्हास्तरीय स्वरूप देत उत्तम गावडे मित्र मंडळाने परंपरा जपण्यासोबतच नव्या पिढीला या खेळाची ओळख करून देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला.


Subscribe










