कुडाळमध्ये बोलेरो पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात

दुचाकीस्वार गंभीर जखमी

कुडाळ : कुडाळ येथील कृष्णाई सुपर मार्केट परिसरात आज एक भीषण अपघात झाला. हायवेच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीने बोलेरो पिकअपला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो जागीच कोसळला. अपघाताचा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. बोलेरो चालकाने अचानक ब्रेक मारल्याने हा अपघात झाला अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती.

अपघाताची माहिती मिळताच शिवसेना तालुका संघटक रोहित भोगटे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ १०८ रुग्णवाहिकेला पाचारण केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दुचाकीस्वाराला स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून तातडीने कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.

या घटनेमुळे कुडाळ परिसरात काही काळ खळबळ उडाली होती आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून जखमी व्यक्तीची ओळख पटली आहे. संबंधित व्यक्तीचे नाव पुंडलिक नाईक असून ही व्यक्ती आंबडपाल येथील रहिवासी असल्याचे म्हटले जात आहे.

error: Content is protected !!