राजापूर तालुक्यातील, वाहन चालकांची, साठी टोल माफी करा, अन्यथा टोल बंद पाडू

सामाजिक कार्यकर्ते अरविंद लांजेकर यांचा इशारा

राजापूर : पाच वर्षापूर्वी झालेल्या आंदोलनानंतर ठप्प झालेला मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्यातील हातिवले येथील टोलनाका कार्यान्वित होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पुढील महिनाअखेरीला हा टोलनाका सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या टोलनाक्यावर तालुक्यातील स्थानिक नागरीकांसह वाहतूकदारांना संपूर्ण टोल माफी देण्यात यावी, अन्यथा, तीव्र आंदोलन छेडू असा इशारा कोंढेतडचे माजी उपसरपंच अरविंद लांजेकर यांनी दिला आहे. त्यामुळे टोलमाफीवरून आतापासूनच वातावरण तापू लागले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर तालुक्यातील हातिवले येथे टोलनाका उभारण्यात आलेला आहे. या टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावी अशी सातत्याने मागणी केली जात आहे. त्यावरून पाच वर्षापूर्वी स्थानिकांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन छेडले होते. तेव्हापासून हातिवले येथील टोलनाका सुरू झालेला नाही वा स्थानिकांच्या टोलमाफीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. दरम्यान, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील महामार्गावरील टोलनाका कालपासून सुरू झाला आहे. तर, पुढील महिनाअखेरीला तालुक्यातील हातिवले येथील टोलनाका सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षापासून सातत्याने धगधगत असलेला स्थानिक वाहनांना संपूर्ण टोलमाफीच्या मागणीने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. राजापूर शहरामध्ये लोकांची विविध कामानिमित्ताने दैनंदीन रहदारी असते. काहीवेळा दिवसातून चार-पाच वेळाही फेर्‍या माराव्या लागतात. या सार्‍या लोकांना टोलनाक्यावरून जा-ये करावी लागते. त्यामुळे सातत्याने टोल फी भरणे वाहनचालकांना आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखे नाही. त्यामुळे हातिवले येथील टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी देण्यात यावी अशी सातत्याने स्थानिकांकडून मागणी केली जात आहे. याबाबतची निवदेनही यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाला स्थानिक वाहनचालक, ग्रामस्थ यांच्याकडून देण्यात आलेली आहेत. मात्र, त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसताना टोलनाका सुरू होण्याच्या सुरू झालेल्या हालचालींमुळे पुन्हा एकदा टोलमाफीचा मुद्दा चर्चेत आला आहे. हातिवले येथे उभारण्यात आलेल्या टोलनाक्यावरून सातत्याने स्थानिक ग्रामस्थांच्या वाहनांची वर्दळ राहणार आहे. त्यामुळे सातत्याने टोल फी भरणे वाहनचालकांना आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखे नसल्याने राजापूर तालुक्यातील स्थानिक नागरीकांसह वाहतूकदारांना या टोलनाक्यावर संपूर्ण टोल माफी देण्यात यावी. अन्यथा, त्याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा श्री. लांजेकर यांनी दिला आहे.

error: Content is protected !!