कुडाळ : जनता केवळ आश्वासनांवर नाही, तर प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या पाठीशी उभी राहते. त्यामुळेच कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील जनतेने आमदार निलेश राणे यांना भरघोस मतांनी विजयी केले, त्यामुळे आमदार निलेश rane यांच्यावर टीका केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसेनेचे कुडाळ उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक यांनी दिला आहे.
माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर जोरदार निशाणा साधताना देवेंद्र नाईक म्हणाले की, “वैभव नाईक यांनी आपल्या कार्यकाळात जनतेची कामे आणि मतदारसंघातील विकासकामांना अपेक्षित गती दिली असती, तर कुडाळ-मालवणची जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली असती. मात्र जनतेने विकासाचा हिशोब मागितला आणि त्याचाच परिणाम म्हणून त्यांना घरी बसवले.”
“आता सत्ता गेल्यानंतर आणि जनतेने नाकारल्यानंतर सुरू झालेली राजकीय धडपड जनतेला सहजासहजी मान्य होणार नाही. आज आमदार निलेश राणे मतदारसंघातील रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विकासकामांसाठी निधी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीवर टीका करण्यापेक्षा आपल्या कार्यकाळाचा हिशोब जनतेसमोर मांडावा,” असा टोला देवेंद्र नाईक यांनी लगावला.
दरम्यान, आमदार निलेश राणे यांच्यावर सातत्याने टीका केली जात असल्यास शिवसेना कार्यकर्ते शांत बसणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. “निलेश राणे यांच्यावर विनाकारण आरोप करून राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला, तर शिवसेना कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत. आमदार निलेश राणे यांच्यावर पुन्हा टीका कराल, तर जशास तसे उत्तर दिले जाईल,” असा स्पष्ट इशारा देवेंद्र नाईक यांनी दिला.
कुडाळ-मालवणच्या जनतेने निवडणुकीत आपला कौल स्पष्टपणे दिला आहे. त्यामुळे आता आरोप-प्रत्यारोपांपेक्षा विकासकामांचा हिशोब आणि प्रत्यक्ष झालेला विकास जनतेसमोर मांडणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“जनता काम करणाऱ्याच्या मागे उभी राहते, हे निवडणुकीच्या निकालाने दाखवून दिले आहे. त्यामुळे आता टीकेचे राजकारण करण्यापेक्षा विकासाचे राजकारण करा,” असा थेट संदेश देखील देवेंद्र नाईक यांनी विरोधकांना दिला आहे.


Subscribe







