शिवडाव येथील घटना
नदीपात्रातील कच्च्या बंधाऱ्यावरून दुचाकी घेऊन जात असताना दुचाकी घसरल्याने पाण्यात पडली चप्पल
कणकवली : नदीपात्रातील कच्च्या बंधाऱ्यावरून दुचाकी घेऊन जात असताना दुचाकी घसरल्याने पडलेली चप्पल काढण्यासाठी नदीपात्रात उतरलेल्या उत्कर्ष मनोहर जाधव (वय 17, रा. शिवडाव – जाधववाडी) या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शिवडाव येथे रामेश्वर मंदिरामागील गडदी पात्रात मंगळवारी दुपारी वाजण्याच्या १.३० वा. सुमारास घडली.
उत्कर्ष हा कणकवली महाविद्यालयामध्ये ११वीत शिकत होता. नुकतीच त्याची परीक्षा झाली असून सध्या प्रॅक्टिकल परीक्षा सुरू होती. महाविद्यालयातून तो घरी येण्यास निघाला होता. शिवडाव येथील रामेश्वर मंदिरा मागील गड नदीपात्रात पुल उभारणीचे काम करण्यात येत असून परिणामी पाणी अडवण्यासाठी बंधारा घालण्यात आला आहे. याच बंधाऱ्यावरून उत्कर्ष हा अन्य दोन मित्रांसोबत दुचाकीने जात होता. बंधाऱ्यावरून जाताना उत्कर्ष याच्या ताब्यातील दुचाकी घसरली. यामध्ये उत्कर्ष याच्या पायातील चप्पल नदीपात्रात पडली. हीच चप्पल आणण्यासाठी उत्कर्ष नदीपात्रात उतरला. मात्र तो नदीपात्रातील खोल पाण्यात बुडाला.
उत्कर्ष नदीपात्रात बुडाल्याचे समजल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अर्ध्या तासाच्या शोध मोहिमेनंतर उत्कर्ष याचा मृतदेह पाण्यात आढळून आला. मृतदेह विच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. यावेळी शिवडाव गावातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. या अपघाती मृत्यूने सर्वच शोकाकूल झाले होते. उत्कर्ष याच्या पश्चात आई, वडील, आजी, आजोबा, बहिण असा परिवार आहे.


Subscribe










