
डंपरसह ४ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त
कुडाळ : कुडाळ पोलिसांनी बुधवारी दुपारी हॉटेल सूर्या समोरील रस्त्यावर बेकायदेशीर वाळू उत्खनन आणि वाहतूक करणारा डंपर पकडला. या कारवाईत ४ लाख रुपये किमतीचा आयशर डंपर आणि १५ हजार रुपयांची वाळू असा एकूण ४ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी डंपर चालक राहुल कुमार पारसनाथ सिंह (२५, रा. झाराप) आणि डंपर मालक अनुप किरण वेंगुर्लेकर (रा. बाव) या दोघांविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई नाट्यमयरित्या पार पडली. बाबासाहेब आंबेडकर नगर रस्त्यावर हा डंपर भरधाव वेगाने येत असताना, तेथे आपल्या मुलासह उभ्या असलेल्या शिवसेना (उबाठा) पक्षाचे कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक यांना तो धडकणार होता. प्रसंगावधान राखून नाईक यांनी या डंपरचा पाठलाग केला आणि तो अडवून कारवाईसाठी कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिला. या संदर्भात पोलीस कर्मचारी शांताराम वराडकर यांनी फिर्याद दिली असून, शासनाची परवानगी न घेता वाळूची विनापरवाना वाहतूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ममता जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि खाण व खनिज (नियमन व विकास) अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सचिन गवस करत आहेत. कुडाळ शहरातील बाजारपेठेच्या दिवशीच झालेल्या या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर वाळू व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.


Subscribe










