मद्यधुंद अवस्थेतील व्यक्तीवर गुन्हा दाखल
खुर्चीतून उठून पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न
कुडाळ : आवळेगाव पोलीस दूरक्षेत्र येथे दारूच्या नशेत येऊन कर्तव्यावर असलेल्या पोलिसांशी हुज्जत घालत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संतोष सिताराम चव्हाण (४९, सध्या रा. ओरोस-रवळनाथनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ एप्रिल रोजी दुपारी ही घटना घडली. हेडकॉन्स्टेबल अनंत तिवरेकर आणि नंदिकिशोर नेरकर आपले शासकीय काम करत असताना, आरोपी संतोष चव्हाण तेथे मोटारसायकलने आला आणि मोबाईल संदर्भात फोन केल्याच्या कारणावरून पोलिसांशी विनाकारण वाद घालू लागला.
वादाचे स्वरूप वाढल्यानंतर आरोपीने खुर्चीतून उठून थेट पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर टेबलवरील सरकारी रजिस्टर खाली फेकून देऊन त्याने पोलीस ठाण्यात मोठा गोंधळ घातला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या सूचनेनुसार आरोपीला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये त्याने मद्यसेवन केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून कुडाळ पोलीस अधिक तपास करत आहेत.


Subscribe










