रक्तदान शिबिरासह विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना भाविकांचा उदंड प्रतिसाद
योगिता कानडे/कुडाळ: पिंगुळी धुरी टेंबनगर येथील श्री देव रायकर यांचा २० वा वर्धापन दिन सोहळा आज रविवार, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. सकाळी ९:०० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा संपन्न झाली. त्यानंतर सकाळी ९:३० ते १२:३० या वेळेत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सामाजिक बांधीलकी जपत आयोजित केलेल्या या शिबिरात परिसरातील तरुणांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून रक्तदान केले.
दुपारी श्रींची महाआरती आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. दुपारच्या सत्रात महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आणि सायंकाळी लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. स्थानिक भजनांच्या सुरांनी परिसर मंत्रमुग्ध झाला होता.
या सोहळ्याची सांगता रात्री उशिरा श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूर यांच्या ‘कर्म प्रकोप’ या दशावतारी नाटकाने झाली. कार्यक्रमाचे नेटके नियोजन रायकर मित्रमंडळ, धुरी टेंबनगर यांच्या वतीने करण्यात आले होते. थोरली आक्का समाज मंदिर परिसरात दिवसभर भाविकांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली.


Subscribe










