हुमरट तिठा ब्रिजवर मारुती सियाज कारचा अपघात

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

कणकवली: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हुमरट तिठा येथील ब्रिजवर आज (शनिवार) एका मारुती सियाज कारचा अपघात झाला. पुणे येथील एक कुटुंब गोव्याला पर्यटनासाठी जात असताना हा अपघात घडला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील कैलास देह हे आपल्या पत्नी आणि मुलासह मारुती सियाज कारमधून (क्रमांक) गोव्याच्या दिशेने जात होते. हुमरट तिठा येथील ब्रिजवर त्यांची कार अपघातग्रस्त झाली. कैलास देह यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या कारला एका ट्रकची धडक बसली, ज्यामुळे हा अपघात झाला.

अपघातामुळे सियाज कारचा पुढील टायर फुटला असून कार डाव्या बाजूने पूर्णपणे घासली गेली होती. अपघातानंतर देह हे भांबावलेल्या अवस्थेत असल्याने त्यांना पुढील काही आठवत नव्हते. विशेष म्हणजे, अपघात घडल्यानंतर धडक देणाऱ्या दुसऱ्या वाहनाने (ट्रकने) घटनास्थळावरून पोबारा केला.

अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच हायवे ट्रॅफिक पोलीस उपनिरीक्षक संतोष राठोड, हवालदार ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रस्त्याच्या मध्यभागी असलेली अपघातग्रस्त सियाज कार बाजूला करून वाहतूक पुन्हा सुरळीत केली.

या अपघातात कुटुंबातील कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली. पोलिसांनी अपघाताची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

error: Content is protected !!