ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते बबन डिसोजा यांचे निधन

मॅन्युअल अँथोनी तथा बबन डिसोजा यांचे रविवारी मुंबईत विलेपार्ले येथे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. रात्री आठ वाजता त्यांच्या इच्छेनुसार पारशीवाडा स्मशानभूमीत विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ते १०१ वर्षांचे होते.

त्यांनी वयाच्या १८व्या वर्षी भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. राष्ट्र सेवा दलात भरीव काम, मिल मजदूर सभेच्या स्थापनेपासून नंतर अनेक वर्षे सक्रिय सहभाग, प्रजा समाजवादी पक्षाचे पूर्ण वेळ चिटणीस, गोवा विमोचन समितीचे व संयुक्त महाराष्ट्र समितीच्या मुंबई शाखेचे कार्यालयीन सचिव, बॅ. नाथ पै, एस. एम. गोरे, मधू दंडवते यांच्या निवडणुकांमध्ये मोठे काम, साने गुरुजीच्या नेतृत्वाखाली काम , १९७५मध्ये आणीबाणीच्या विरोधात काम, नंतर मुंबई जनता दलात अनेक वर्षे काम, १९८० साली मालवणमध्ये बॅ. नाथ पै सेवांगणाच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा अशा प्रकारचे विविध काम त्यांनी केले. हे सारे काम करताना अत्यंत निर्मल आणि नि:स्वार्थी स्वभाव, सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याची हातोटी हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

बबन डिसोजा यांचा जन्म ३ सप्टेंबर १९२४ रोजी मालवण तालुक्यातील कट्टा या गावी झाला. लहानपणीच आई वारल्यामुळे वे बहिण व वडीलांसोबत ते काकांच्या घरी राहू लागले. चुलत भावंडांसोबत बालपण व प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर त्यानी मालवणच्या टोपीवाला हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतले. १९४२ च्या भारत छोड़ो आंदोलनात ते सक्रीय झाले. मालवण परिसरातील राजकोट येथे वायरलेस स्टेशन जाळण्याच्या संदर्भात त्यांना पोलिसांनी अटक केली.

बबन डिसोजा यांनी स्वातंत्र्यलढ्याबरोबरच गावोगावी राष्ट्र सेवा दलाच्या शाखा सुरु करणे व प्रमुख ठिकाणी शिबीरे भरविणे यावर भर दिला होता. १९४४ साली ते मुंबईला आले. भूमिगत कार्य चालू असले तरी उपजिवीकेसाठी नोकरी करणे गरजेचे होते. त्यांनी प्रिंटींग प्रेस व मुंबई महापालीकेत नोकरी केली. नंतर टाइम्स ऑफ इंडियात मुद्रित तपासनीसाचे काम केले. पण त्यांचे मन नोकरीत रमेना. ते काँग्रेस सोशलीस्ट पक्षाचे सदस्य झाले. पुढे साने गुरुजी आणि अशोक मेहता यांच्या नेतुलाखाली १९४७ साली मिल मजदूर सभेची स्थापना झाली. मिल मजदूर सभेत बबन डिसोजा यांनी पूर्ण वेळ कार्य करणे सुरु केले. १९५० च्या गिरणी कामगारांच्या बोनसच्या प्रश्नावर ६२ दिवसांच्या ऐतिहासिक संपात त्यांनी भरीव कार्य केले. पुढे ते मिल मजदूर सभेतून मुंबई शहर प्रजा समाजवादी पक्षाचे पूर्ण वेळ चिटणीस झाले.

१९८० साली मालवणमध्ये बॅ. नाथ पै सेवांगणाच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. या व्यतिरिक्त त्यांनी व्यावसायिक जीवनात अनेक पदे सांभाळली. त्या पैकी मुख्य म्हणजे मिल मजदूर सभेचे अध्यक्ष पद व मालवण मधील बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्षपद होय. नाथ पै सेवांगणात शैक्षणिक, शेतीविषयक व सामाजिक विकासासाठी अनेक उपक्रम राबविले. या व्यतिरिक्त खेडोपाडी स्वातंत्र्यसैनिकांना सरकारी पेन्शन मिळावे या साठी त्यांनी अनेक स्वातंत्र्यसैनिकांना भेटून पेन्शनसाठी नोंदणीचे आवाहन केले, सरकारी पेन्शनमुळे अनेक स्वातंत्र्यसैनिकांना दिलासा मिळाला.

बबन डिसोजा यांच्या पत्नी रतन डिसोजा यांनीही समाजवादी चळवळीत त्याना उत्तम साथ दिली. त्यांचे २००५ साली निधन झाले. बबन डिसोजा यांच्यामागे मुलगी राणी पाटील, जावई सतीश आणि नातू राहुल असा परिवार आहे.

error: Content is protected !!