कारची दुचाकीला जोरदार धडक; महिला गंभीर जखमी

अपघातानंतर कारचालकाचा पलायन करण्याचा प्रयत्न

स्थानिकांकडून कारचालकाला बेदम चोप

कणकवली : गोव्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या एका कारने कणकवली शहरातील पटवर्धन चौकात दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवर मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, हरकुळ देऊळवाडी येथील गणेश घाडीगावकर हे त्यांची पत्नी आणि मुलासोबत दुचाकीवरून कणकवलीतून जात असताना ही घटना शुक्रवारी रात्री १०.४५ च्या सुमारास घडली. अपघातानंतर कारचालक आपली कार (क्रमांक: RJ ०६ CD ८०१०) पुन्हा पटवर्धन चौकातून वळवून मुंबईच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, स्थानिक नागरिकांनी सतर्कता दाखवत त्याला पुजारी इलेक्ट्रॉनिक्ससमोर पकडले.

संतप्त जमावाने त्याला बेदम चोप दिला. या गोंधळातूनही कारचालकाने पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, हॉटेल मिंटलिफसमोर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी महिलेला अधिक उपचारांसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

error: Content is protected !!