कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावरील पणदूर पुलाच्या पुढील खड्डेमय झालेल्या रस्त्यात दुचाकी घसरून अपघात झाला. हा अपघात शनिवारी रात्री १:३० वा. च्या सुमारास झाला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात देवगड तालुक्यातील वरेरी – राणेवाडी येथील दर्शन प्रभाकर राणे हा युवक गंभीर जखमी झाला होता. अक्षरशः रक्तबंबाळ अवस्थेत दर्शन राणे हा युवक महामार्ग पोलीस गस्त घालत असताना सापडला. तातडीने महामार्ग पोलीस एएसआय प्रकाश गवस, चालक एएसआय गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल नितीन शेट्ये, पोलीस कॉन्स्टेबल रवि इंगळे यांनी रुग्णवाहिकेला पाचारण करून गंभीर जखमी झालेल्या दर्शन प्रभाकर राणे या युवकाला उपचारासाठी रुग्णालयात हलविले. पणदूर येथील मार्गावर पडलेले खड्डे, आणि रस्त्यावर आलेली खडी ही अपघातांना निमंत्रणच ठरत आहे. त्यामुळे येथील डागडुजी तातडीने करण्यात यावी अशी मागणी देखील जोर धरत आहे.