गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा ठरला प्रेरणेचा दीपोत्सव!

सोहम कॉम्प्युटर एज्युकेशन, पणदूर यांचा स्तुत्य उपक्रम

पणदूर (ता. कुडाळ) : शैक्षणिक गुणवत्ता आणि संगणक साक्षरतेच्या प्रसारासाठी कार्यरत असलेल्या सोहम कॉम्प्युटर एज्युकेशन, पणदूर यांच्या वतीने “गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा – सन्मान गुणवंतांचा” हा प्रेरणादायी कार्यक्रम शुक्रवार, ३० मे २०२५ रोजी शिवाजी इंग्लिश स्कूल, पणदूर-तिठा येथे उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून श्री. सत्यपाल लाडगावकर (मुख्याध्यापक, पेंढरी हायस्कूल, देवगड) उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून श्री. प्रदीप सावंत (सहाय्यक शिक्षक, सोनुर्ली हायस्कूल, सावंतवाडी व कार्याध्यक्ष – शिक्षक भारती, सिंधुदुर्ग) यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

शिक्षक भारतीचे राज्य कार्यवाह श्री. संजय वेतुरेकर, संस्थेच्या संचालिका सौ. पूजा वेतुरेकर, प्राचार्य सावंत सर, तरुण आर्किटेक्ट श्री. शिवम् वेतुरेकर, सोहम वेतुरेकर, मान्यवर पालक, शिक्षकवृंद तसेच पंचक्रोशीतील अनेक गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सौ. पूजा वेतुरेकर यांनी स्वागत व प्रेरणादायी प्रास्ताविकाने केली. त्यांनी कार्यक्रमामागील उद्देश विषद करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान करताना त्यांना नव्या उंचीची प्रेरणा देणे हाच आमचा हेतू आहे.”

यानंतर, डिगस, आवळेगाव, हिर्लोक व पणदूर येथील माध्यमिक शाळांतील इ. १० वीमध्ये प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणारे विद्यार्थी, तसेच सोहम कॉम्प्युटर एज्युकेशनमध्ये MS-CIT कोर्स पूर्ण करणारे आणि फेब्रुवारी-मार्च २०२५ मधील इ. १० वी व १२ वी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यांचा सन्मानचिन्ह व आकर्षक पेन देऊन गौरव करण्यात आला.

गौरवप्राप्त विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना संस्थेच्या मार्गदर्शनाचे व वेळोवेळी मिळालेल्या प्रेरणेचे मन:पूर्वक आभार मानले. सौ. पूजा मॅडम आणि वेतुतेकर सर यांचे विशेष कौतुक करत, “त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आमच्यात आत्मविश्वास निर्माण झाला”, असेही विद्यार्थ्यांनी नमूद केले.

यानंतर श्री. संजय वेतुरेकर सरांनी आपल्या प्रभावी भाषणात सांगितले, “उच्च शिक्षणाच्या वाटचालीत कोणतीही अडचण भासल्यास आम्ही तुमच्यासोबत आहोत.” त्यांनी विद्यार्थ्यांना धैर्य, जिद्द आणि सातत्याचे महत्त्व समजावून सांगितले, तसेच संस्थेची सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली.

प्रमुख अतिथी श्री. प्रदीप सावंत यांनी आपल्या भाषणात म्हटले, “विद्यार्थ्यांचे कौतुक करणाऱ्यांचेही कौतुक व्हायला हवे!” त्यांनी सोहम संस्थेच्या उपक्रमाचे विशेष कौतुक करत सांगितले की, “डिजिटल युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही. आता AI चा जमाना आहे. संगणकही शिकतो आणि निर्णय घेतो. तुमचं आयुष्य म्हणजे कोरं कॅनव्हास – त्यावर मेहनत, प्रामाणिकपणा, संगणकज्ञान आणि स्वप्नांच्या रंगांनी जीवन सजवा!”

अध्यक्षीय समारोपात श्री. सत्यपाल लाडगावकर सरांनी विद्यार्थ्यांना काळाच्या पुढे राहण्याचे आणि तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन करत सांगितले, “स्वतःच्या अंत:करणाचे ऐका आणि त्यानुसारच करिअरची दिशा ठरवा.” त्यांनी आत्ममूल्यांकन, प्रयत्नशीलता आणि स्पष्ट ध्येयधोरणांचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अत्यंत नेटके आणि प्रभावी पद्धतीने पार पडले. सर्व मान्यवरांचे शाल व रोप देऊन सन्मान करण्यात आला. शेवटी श्री. संजय वेतुरेकर सरांनी उपस्थितांचे आभार मानले. सर्वांना अल्पोपहार देण्यात आला.

सोहम कॉम्प्युटर एज्युकेशन, पणदूर यांचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ गौरवाचा नव्हे, तर त्यांच्या भविष्याच्या प्रवासात नवी दिशा देणारा दीपस्तंभ ठरला.

error: Content is protected !!