कुडाळ : गांजा सेवन केल्याप्रकरणी कुडाळ दोघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई काल रात्री उशिरा करण्यात आली. दिनार दिलीप खानविलकर (वय २७ रा. पिंगुळी-सराफदारवाडी) आणि वसंत ज्ञानेश्वर पडते (वय २९, रा. कुडाळ बाजारपेठ, गेनू प्रसाद कॉम्प्लेक्स) अशी या दोन तरुणांची नावे आहेत. त्यांच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारक परिणाम पदार्थ अधिनियम कलमाप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी फिर्याद पोलीस शिपाई योगेश मांजरेकर यांनी तक्रार दिली. अशी माहिती कुडाळ पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
कुडाळ शहरात गांजा व अन्य अमली पदार्थांचे सेवन वाढले असून कुडाळमध्ये विक्री होत असल्याच्या घटना पुढे येत असल्याने पोलिसांनी गस्त वाढवली आहे. काल पोलिसांनी दोघा युवकांना संशयास्पद रित्या वावरत असताना ताब्यात घेतले. त्यांनी गांजा सेवन केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. गांजा सेवन केल्याची कबुली पोलिसांना दिली. याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून चौकशी डीडी माने करीत आहेत.