आमदार निलेश राणे यांची संकल्पना
कुडाळ : कोकणातील रोबांट व राधा नृत्य या लोककलेला स्पर्धेच्या माध्यमातून ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतील 29 व 30 मार्चला भव्य रोबांट व राधानृत्य व चित्ररथ स्पर्धेचे आयोजन कुडाळ येथे करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी दिली.
कोकणात अनेक सणांमध्ये शिमगोत्सव महत्त्वाचा मानला जातो. पण हा सण ग्रामीण भागात घरोघरी मोठ्या प्रमाणात होत आहे. शहरी भागात या रोबांट व राधानृत्य लोककलेचा प्रसार प्रचार व्हावा स्पर्धेच्या माध्यमातून ही कला अधिक बहरत जावो हा उदात्त दूरदृष्टीकोन ठेवून महायुतीच्या माध्यमातून आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली 29 मार्चला येथील तहसीलदार नजिकच्या शासकीय मैदानावर सायंकाळी सहा वाजता रोंबाट व राधानृत्य या भव्य लोककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी मोठ्या रकमेची पारितोषिक ठेवण्यात आलेली आहेत. तसेच या कलेदरम्यान लक्षवेधी चित्ररथ या शिमगोत्सवात सहभागी होणार आहेत. त्यांची चित्ररथ बनवण्याची कला व त्यांची मेहनत पाहता स्पर्धेच्या व्यतिरिक्त या सर्व सहभागी चित्ररथांना योग्य ते मानधन दिले जाणार आहे. तर 30 मार्चला मराठी नवीन वर्षाचे स्वागत गुढीपाडव्याने होणार आहे. या निमित्ताने संध्याकाळी सहा वाजता आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शोभायात्रा कुडाळ शहरात काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत जिल्हाबाहेरचे भव्य चित्ररथ सहभागी होणार आहेत.
या सोहळ्यात माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व काही मंत्री यांची उपस्थिती असणार आहे. सर्वांनी या दोन्ही दिवस चालणाऱ्या भव्य सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री कुडाळकर यांनी केले. यावेळी शिवसेनेचे संजय पडते, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, युवानेते दादा साईल, तालुकाप्रमुख बंटी तुळसकर, अरविंद करलकर, रत्नाकर जोशी, भाजपा तालुकाअध्यक्ष संजय वेंगुर्लेकर आदि उपस्थित होते.













