झाराप येथील मारहाण घटना निंदनीयच !

हॉटेल व्यावसायिक आणि व्यापारी संघटनेने केला निषेध…

जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार…

कुडाळ :- झाराप झिरो पॉईंट येथे दोन दिवसांपूर्वी पर्यटकांना मारहाण झालेले ते हॉटेल नसून ती एक साधी चहाची टपरी आहे. त्या टपरीचा हॉटेल व्यावसायिक संघटना किंवा व्यापारी संघटनेशी कोणताही संबंध नाही. कुडाळ तालुक्यातील हॉटेल चालक-मालक, व्यापारी नेहमीच पर्यटक व ग्राहकांना सन्मानाची वागणूक देतात. त्यामुळे त्या चहाच्या टपरीवर घडलेल्या प्रकरणातील दोषींवर पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करावी. यासाठी दोन दिवसांत जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन लक्ष वेधण्यात येणार आहे, अशी माहीती सिंधुदुर्ग जिल्हा हॉटेल चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजन नाईक व व्यापारी संघटनेचे कुडाळ तालुकाध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कुडाळ एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृह येथे शनिवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. नाईक व श्री. शिरसाट बोलत होते. यावेळी व्यापारी महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये, रितेश परब, रत्नाकर प्रभुतेंडोलकर, अमित सुकी, प्रसाद मालवणकर, कुणाल कोचरेकर, संतोष आईर, जयराम डिगसकर, अवधूत शिरसाट आदी उपस्थित होते.

श्री. नाईक म्हणाले, झाराप येथे घडलेली घटना सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून घातक आहे. झारापला घडलेली घटना ही हॉटेल मध्ये घडलेली नसून ती एका साध्या चहाच्या टपरीवर घडली आहे. सदर चहाच्या टपरीला कोणताही परवाना नसून ती बेकायदेशीर आहे. शनिवारी आम्ही झारापला प्रत्यक्ष जाऊन घडलेल्या घटणेची माहीती जाणून घेतली. या प्रकरणातील मुख्य संशयित हा अल्पवयीन आहे, शिवाय त्या परिसरात अंमली पदार्थ, दारु सारखे अवैध व्यवसाय चालत असल्याची माहीती आम्हाला मिळाली आहे. पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हे बेकायदा व्यवसाय त्वरीत बंद करावेत अशी मागणी श्री. नाईक यांनी केली. सदर टपरीच्या मालकाचा आमच्या संघटनेशी काडीचाही संबंध नाही. आमची संघटना यापुढेही पर्यटक व ग्राहकांना चांगल्या सुखसोयी, सुविधा, चांगली वागणूक देणार आहेत, असे श्री. नाईक यांनी सांगितले.

श्री. शिरसाट म्हणाले, झारापला घडलेली घटना निषेधार्ह आहे. यापुढे अशाप्रकारची घटना घडल्यास व्यापारी संघटना कोणतेही सहकार्य करणार नाही. पर्यटन जिल्ह्यात पर्यटकांच्या सुरक्षेला व्यापारी संघटना व हॉटेल व्यावसायिक महत्त्व देतात. त्यामुळे अशा चुकीच्या पद्धतीची घटना घडल्यास आमची संघटना कोणालाही पाठीशी घालणार नाही. पर्यटक किवा एखाद्या ग्राहकाशी वाद झाल्यास कायदा हातात घेण्याची अजिबात गरज नाही. संघटना किवा पोलिसांशी संपर्क साधावा. पर्यटक व ग्राहक आम्हाला महत्त्वाचे आहेत. कुडाळात मोठ्या संख्येने पर्यटक येण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत, असे श्री. शिरसाट यांनी सांगितले.

error: Content is protected !!